श्रीरामपूर –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात उभारण्यात यावा, या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज काळे यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले.
डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागणीची दखल घेत नसल्याचा आरोप मनोज काळे यांनी केला.या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘बाबासाहेबांचा पुतळा हे फक्त प्रतीक नसून सामाजिक स्वाभिमानाचे आणि हक्काच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे,’अशी घोषणाबाजी केली.मनोज काळे यांनी मागील काही महिन्यांपासून विविध स्तरांवर आंदोलने केली होती. उपोषण, निवेदनं, मोर्चे, पत्रव्यवहार आणि बैठका अशा माध्यमातून त्यांनी आपली मागणी प्रशासनापुढे मांडली.मात्र तरीही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून संभाव्य दुर्घटना टळली. या प्रकारामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, युवक वर्ग आणि आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर पुतळा उभारणीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी उपस्थित आंदोलकांनी ही बाब केवळ एका वर्गाची नव्हे, तर संपूर्ण शहराच्या अस्मितेशी निगडीत आहे. सदर प्रकारानंतर शहरातील विविध सामाजिक संघटना, बुद्धिस्ट सोसायट्या आणि युवक समूह एकत्रितपणे पुढील आंदोलनाची दिशा ठरवत असून प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
