श्रीरामपूर-
तालुक्यातील बेलापूर येथील भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे येथील के. के. आय (बुधरानी) हॉस्पीटल, डॉ. काळे हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित मोतिबिंदू शिबिराच्या उपक्रमाने शतक पूर्ण केल्याबद्दल नुकतेच शतकपूर्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपने बुधरानी हॉस्पिटलच्या सहकार्याने तसेच डॉ. सुधीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षांपूर्वी सन २०१६ मध्ये मोतीबिंदू तपासणी शिबिराच्या उपक्रमास प्रारंभ केला. या शिबिरात ज्या रुग्णांचे मोतीबिंदू निदान होईल. त्यांच्यावर पुणे येथील बुधरानी हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतात. आजवर हजारो गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

या उपक्रमाचे शंभरावे शिबिर बेलापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. संपदा सुधीर काळे यांच्या हस्ते तसेच भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे, डॉ. सुधीर काळे, भगिरथ मुंडलिक, गिरीश परांजपे, बाबासाहेब अमोलिक, बुधरानी हॉस्पीटलच्या मनिषा कोरडे आदींच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. यावेळी अभिषेक खंडागळे यांनी सदरच्या उपक्रमाच्या शातकपूर्तीचे श्रेय स्वस्तिक ग्रुपचे सदस्य डॉ. सुधीर व डॉ. संपदा काळे, बुधरानी हॉस्पीटल यांना दिले. तसेच यापुढेही हा उपक्रम राबविला जाईल, असे सांगितले. गेली नऊ वर्षे सातत्य राखून मोतीबिंदू शिबिराची शतकपूर्ती केल्याबद्दल अनेकांनी खंडागळे परिवार, स्वस्तिक ग्रुप, डॉ. काळे परिवार तसेच बुधरानी हॉस्पीटलच्या संचालकांचे कौतुक केले.