श्रीरामपूर –
तालुक्यातील एकल महिलांच्या ८० पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत साऊ एकल समितीने आपल्या विधायक कार्यातून संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. पालिकेच्या आगाशे सभागृहात रविवारी समितीच्या वतीने लोकसहभागातून गणवेश, स्कूल बॅग, वह्या, कंपास, जेवणाचा डबा, पाणी बाटली, टिफिन बॅग असे साहित्य वाटप केले.माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, अध्यक्षा मंजुषा ढोकचौळे, सुदर्शन पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास चव्हाण, माजी नगरसेविका वैशाली चव्हाण, कॉ. जीवन सुरूडे, अजित बाबेल, कैलास खंदारे, भाजपचे माजी शहराध्यक्ष मारूती बिंगले, विजय आखाडे, मेजर कृष्णा सरदार, महेश ढोकचौळे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता शर्मा, कविता दुबे, पूजा चव्हाण, शंभूक वसतिगृहाचे अधीक्षक अशोक दिवे, पत्रकार अनिल पांडे, महेश माळवे, रवी भागवत, संजय दुशिंग आदी उपस्थित होते
एकल महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचा आवाज होण्यासाठी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकारातून राज्यातील ८० तालुक्यात समितीचे जाळे उभे केले आहे. या शैक्षणिक सत्रापासून समितीने एकल महिलांच्या लेकरांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील जाणीव, संवेदना असणाऱ्या व्यक्तींना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.समाजाला एकल महिला व त्यांच्या प्रश्न व कुटुंबाशी जोडून या विद्यार्थ्यांना कौटुंबिक स्नेह आधार मिळवून देणे, हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकु मार साळवे यांनी सांगितले.समितीचे तालुका समन्वयक मुकुंद टंकसाळे यांनी क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेची सविस्तर माहिती दिली. अनुराधाताई आदिक व श्रीनिवास बिहाणी यांनी साऊ समिती एकल महिलांसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक करून या महिलांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.यावेळी मंजुषा ढोकचौळे, अशोक दिवे, वैशाली चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब जपे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, दिलीप लोखंडे, मुकुंद टंकसाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तालुका समन्वयक श्रीकृष्ण बडाख यांनी स्वागत केले. तालुका समन्वयक दिलीप लोखंडे यांनी आभार मानले
