श्रीरामपूर-
दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेने आषाढी एकादशी निमित्त शनिवारी बालदिंडीचे आयोजन केले होते.या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी,पायजमा,बंडी,धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज,टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणेची साथ,’ज्ञानोबा तुकोबांचा व विठोबा रुक्माई’चा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधले होते.”दिंडीत शाळेतील सुमारे 1500 हुन अधिक बाल वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या दिंडी सोहळ्यासाठी तहान-भूक विसरून बाल वारकरी सकाळपासूनच शाळेत वारकरी वेशात मोठया उत्साहाने हजर झाले होते. शाळेतील बालवारकऱ्यांना पाहून ”विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली..” या ओळी ग्रामस्थ,पालकांच्या ओठी आपसूकच येत होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी,तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक व हुभेहुब वेशभूषा केली होती,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह हातात विविध समाज प्रबोधनपर संदेश देत गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना संदेश दिला.वारीत बालवारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारीत जसे उंच पताका घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते,स्टील पाटीतील फुगडीचे फेर धरत पंढरपुरात,दिंडीत वारकरी जसे खेळ करतात तसे हुबेहूब खेळ खेळत होते.
बालवारकऱ्यांच्य या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता. शाळेतील विठ्ठल-रुक्मिणीची अगदी हुबेहूब वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत ग्रामस्थ,पालक व महिलावर्ग फोटो काढून घेण्यासाठी गर्दी करत होते.
दिंडी सोहळ्यासाठी हिंद सेवा मंडळाचे मानदसचिव संजय जोशी, वैशाली जोशी,शाळेचे चेअरमन ऋषिकेश जोशी, रेणुका जोशी, संजय छल्लारे, अशोक उपाध्ये बालवाडी विभागाचे चेअरमन सुशीलजी गांधी , स्कूल कमिटी सदस्य अमोल कोलते, गोपाल उपाध्ये, सौ. रत्नमाला गाडेकर , अरुण धर्माधिकारी, संजय कासलीवाल,चंद्रकांत सगम,विजय सेवक, तसेच श्रीमती रमाताई धीवर प्रशासकीय अधिकारी श्री बी एस कांबळे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पंढरपूर तीर्थक्षेत्राचे आणि वारीचे महत्व कळावे,त्यांना प्रत्यक्षात दिंडी सोहळा,रिंगण सोहळा कसा आयोजित करतात त्याची माहिती दिली असल्याचे मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी सांगितले.
