श्रीरामपूर-
पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा पर्वणीचा काळ मानला जातो. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गेल्या १५ वर्षांपासून सलगपणे या वारीत सहभागी होत असून, यंदाही त्यांनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विविध दिंड्यांना भेटी देत वारकऱ्यांशी संवाद साधला.
वारीदरम्यान कांबळे यांनी, “अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. विठ्ठल चरणी साकडे घालू की, संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडो, जमिनीवर हिरवळ फुलो आणि प्रत्येक शेतकरी सुखी होवो,” असे भावनिक आवाहन केले.
त्यांनी यावेळी सांगितले की, “मी स्वतः पूर्वी पायी वारी केली आहे. पायी चालताना शरीर थकतं, पण मनात फक्त विठ्ठल असतो. त्याच नावात शक्ती आहे. तीच ऊर्जा देणारी असते. म्हणूनच वारकरी विठ्ठलाच्या ओढीने वारी पूर्ण करतो आणि नतमस्तक होतो.”
यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते राजेंद्र देवकर, तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, अॅड. सुभाष जंगले, मराठा संघाचे नेते सुरेश कांगुणे, पत्रकार बाळासाहेब भांड, सुनील नवले, अनिल पांडे, महेश माळवे व गौरव साळुंके आदी उपस्थित होते.कांबळे यांनी भेर्डापूर, निपाणी वडगाव, पाथरे खुर्द, वाकडी, टाकळीमिया, मांजरी, कारेगाव, देवळालीप्रवरा, लांडेवाडी, मुठेवाडगाव या गावांतील दिंड्यांना भेटी दिल्या. या ठिकाणी दिंडीचे चालक आणि वारकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पंढरपूरात त्यांनी देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिंडीत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. याशिवाय, सरला बेटावरील महंत रामगिरी महाराज यांच्या मठातही त्यांनी भेट देऊन चर्चा केली.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सध्या व्हीआयपी दर्शन बंद असल्याने त्यांनी कोणतीही विशेष मागणी न करता मंदिराबाहेरून प्रदक्षिणा केली आणि नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्रीरामपूरकडे प्रयाण केले.
