श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आमच्याकडे ज्या महिला पदाधिकाऱ्यांची तक्रार आली, त्यानुसार आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रीतसर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची तक्रार केली आहे. त्यामुळे यात कुणाची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही.यासंदर्भात लवकरच ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली, त्या सर्व महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी काल केलेल्या खुलशावर तृप्ती देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, नितीन दिनकर यांच्या विरोधात जी लेखी तक्रार महिलांनी आम्हाला दिली त्यानुसार रीतसर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केलेली आहे, जो त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला कधीही अपलोड झालेला नाही.
काही महिन्यांपूर्वी हा व्हिडिओ दिनकर यांनी अपलोड केला असे त्यांचे म्हणणे आहे परंतु महिलांबरोबर नाचताना व दारू पितानाचा हा व्हिडिओ त्यांनी कधीच अपलोड केलेला नाही. नितीन दिनकर हे स्वतःच्या बचावासाठी साफ खोटं बोलत आहेत.
आमच्याकडे जी तक्रार आली त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे त्यामुळे कुणाची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही.यासंदर्भात लवकरच ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे त्या सर्व महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.