श्रीरामपूर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचऱ्यांमधील वादाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. आता तर वीज विभागातील अभियंत्याने थेट कंत्राटी कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. संदिप वायकर या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मनोज मोरे या अभियंत्याविरूद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच सर्व विभागात लेखी तक्रारही पाठविण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, संदिप हौशीराम वायकर हे गेल्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने डाटा ऑपरेटर म्हणून पालिकेत कार्यरत आहे. त्यांची नियुक्ती वीज विभागात करण्यात आली होती. दरम्यान गेल्या पाच महिन्यापूर्वी मनोज संजय मोरे हे वीज विभागात अभियंता म्हूणन बदलून आले. त्यांनंतर वायकर व मोरे यांच्यात अनेकदा कामावरून व इतर कारणावरून खटके उडत होते. मोरे हे मद्यपान करून कामावर येत असल्याचा आरोपही तक्रारीमध्ये केला आहे. मद्यधुंद अवस्थेत मोरे कार्यालयात वायकर यांच्यावर चिडचीड करणे, शविगाळ करणे, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे वाजवणे तसेच गुलामासारखी वागणूक देत होते. शिवाय कुठलेही कारण नसताना १८ जून रोजी वायकर यांना कामावरून काढून टाकत आपल्या पत्नीला ठेकेदाराकरवी कंत्राटी पदावर नियुक्त करून घेतले.
वायकर यांनी याबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी मोरे यांना समज दिली. मात्र त्यांच्या वगणुकीत कुठलाही बदल झाला नाही. उलट १९ जून रोजी वायकर कामावर आले असता. मोरे यांनी त्यांना खुर्चीतून उठण्यास व बाहेर जाण्यास सांगितले. वायकर यांनी नकार दिल्यानंतर मोरे यांनी वायकर यांना गचांडीस धरून बाहेर ढकलले. त्यांना धक्काबुककी व शिवीगाळ केली. घडला प्रकार प्रारंभी उपमुख्याधिकारी यांच्याकडे व नंतर मुख्याधिकारी यांना सांगण्यात आला. आता वाकयर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी मोरे यांच्या विरूद्ध अदलख पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
पाच महिन्यांपासून वाद…
गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. वायकर यांनी याबाबत माझ्याकडे तक्रारही केली होती. काल त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती आहे. दोघांची बाजू समजावून घ्यावी लागेल.
- मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी, नगर परिषद श्रीरामपूर