श्रीरामपूर –
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. ही मिरवणूक सकाळी ११.३० वाजता बाजाठाण येथील श्री आशुतोष महादेव मंदिरातून निघाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, जयघोषात आणि विविध रंगीबेरंगी चित्ररथांच्या साथीत ही मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचली.या मिरवणुकीत सप्तक्रोशीतील तसेच पंचक्रोशीतील शाळा, प्राथमिक विद्यालये, तरुण मंडळे, भक्त-भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येक गावाने आपली अध्यात्मिक समर्पण भावना वेगवेगळ्या चित्ररथांतून सादर करत हरिनाम सप्ताहाच्या स्वागतात योगदान दिले. भामठाण येथील वारकरी भजनी मंडळींनी सरला बेट ते अवलगाव दरम्यान मोटारसायकल रॅलीही काढली.

सप्ताहस्थळी पोहोचताच “गंगागिरी महाराज की जय”, “रामगिरी महाराज की जय” चा जयघोष झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रमेश बोरणारे, विश्वासंत मधुकर महाराज, सप्ताहाचे उपाध्यक्ष हरिशरण महाराज, संदीप महाराज, योगानंद महाराज, माऊली महाराज, रंजळे महाराज, मधुसूदन महाराज, बहिरट महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब चिडे, अविनाश गलांडे, ज्ञानेश्वर व वंदना मुरकुटे यांचाही विशेष सहभाग होता.कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रामगिरी महाराजांचे संतपुजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “१७७ वा सप्ताह आमच्याकडे झाला. महाराजांनी जे सांगितले, ते पूर्णत्वास नेले. आज १७८ व्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सात गावांनी उत्तम नियोजन करून उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे.”

महिलांचा, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा या सप्ताहाची विशेषताच आहे, असे सांगून मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतीला बळकटी द्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.आमदार रमेश बोरणारे यांनी सप्ताहाच्या आयोजनाचे कौतुक करत सहभागी गावांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मधु महाराज यांनी केले.
