श्रीरामपूर-
गंगागिरी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह यंदा कमालपूर (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि शनी देवगाव (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोन गावांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमेवर उद्यापासून होत आहे.परिसरातील असंख्य गावांतून भाविक मोठ्या भक्तीभावाने वारकरी संप्रदायाची भगवी पताका हाती घेऊन सप्ताहात सहभागी होणार आहेत.शनी देवगाव येथे दि.३० जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान सुमारे 225 एकराच्या विस्तीर्ण परिसरात आणि गोदावरी नदीच्या काठावर वारकऱ्यांचा भक्तीभावाचा हा अनुपम सोहळा रंगणार आहे.

रामेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र देवगाव शनी या पवित्रस्थळी योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरीनाम सप्ताहास सकाळी भव्य दिव्य मिरवणूकीने सुरवात होणार आहे.प्रारंभी सकाळी महंत सद्गुरु श्री रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी व हरिपाठ दिंड्यांची मिरवणूक निघणार आहे.मिरवणुकीनंतर हजारो टाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भजनास प्रारंभ होणार आहे.त्यानंतर आलेल्या भाविकांसाठी पुरणपोळ्या व मांड्यांचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.११ हजार टाळकरी सप्ताहात १६८ तास (चारही प्रहरांत) अखंड भजन करणार आहेत.या सप्ताहात दररोज किमान दोन ते तीन लाख भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत असते. यासाठी लागणारे किचन शेड सज्ज झाले असून त्यात १५ भट्ट्यांवर बुंदी तर २० भट्ट्यांवर आमटी तयार होते. प्रत्येकी १२ हजार लिटर क्षमतेच्या दहा टँकरमधून आमटी भोजनासाठी मोकळ्या मैदानात बसलेल्या भाविकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.तसेच अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांतील २०० गावांतून दररोज भाकरी सप्ताहस्थळी पोहोचतात. गावांचे वेळापत्रकही यासाठी बनविण्यात आलेले आहे.सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (ता. ६ ऑगस्ट) महंत रामगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची समाप्ती होणार आहे.सप्ताहात शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती, यांत्रिकी साधने, जैविक तंत्रज्ञान व नवकल्पनांवर आधारित कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
