श्रीरामपूर-
श्रीरामपूर बाजार समितीने उपबाजार मार्केट निर्मिती करून बाजार समितीचा विस्तार करावा. चांगले काम करत असताना अडचणी येत असतात.आता तर तुमच्याकडे विरोधकच नसल्यामुळे चांगले निर्णय घेता येतील.तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन आ. हेमंत ओगले यांनी केले.
श्रीरामपूर बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सभापती सुधीर नवले होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, संचालक सचिन गुजर, राजेंद्र पाऊलबुद्धे, राजू चक्रनारायण, दशरथ पिसे, मयूर पटारे, सोन्याबापु शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, प्रमोद भोसले, पंडित बोंबले आदी उपस्थित होते.
आ. ओगले म्हणाले चांगले काम करणाऱ्याला त्रासाला सामोरे जावे लागते. लढणे व संघर्ष करणेही ओघाने येते.बाजार समितीच्या सत्ताधाऱ्या विरोधात 16 याचिका दाखल होत्या.पैकी 13 चा निकाल समितीच्या बाजूने लागला आहे. यावरूनच संघर्षाची जाणीव होते. बाजार समितीत असलेले शेतकरी भोजनालय पुन्हा सुरू करावे. पोलीस चौकी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. राहुरी व नगर येथील कांदा लिलाव कशा पद्धतीने होतात त्याची पाहणी करा. बाजार समितीने रुग्णालय सुरू करण्याची मागणी पुढे आली. बाजार समितीने व अशोक कारखान्याने मनावर घेतले तर रुग्णालयही उभारता येईल.यासाठी सिद्धार्थ मुरकुटे यांनी मार्केट कमिटीच्यावतीने वकिली करावी.एमआयडीसीत नवनवीन उद्योग घेऊन रोजगार वाढीसाठी आपण प्रयत्न केला असून मदर डेअरी या दूध उत्पादन क्षेत्रातील मोठ्या उद्योगाबरोबरही आपली चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले
प्रास्ताविक करताना सुधीर नवले यांनी बाजार समितीला 1 कोटी 55 लाख रुपयांचा नफा झालेला आहे. बाजार समितीचे उत्पन्न 4 कोटी 55 लाख रुपये इतके झालेले आहे. अंतर्गत काँक्रिटीकरण व इतर विकास कामे सुरू आहेत मात्र विरोधकांकडून वारंवार दाखल होणाऱ्या याचिका व तक्रारीमुळे या कामास बाधा येत असल्याचे सांगितले.करण ससाणे म्हणाले बाजार समितीची नेहमीच शेतकऱ्यांना मदतीची भूमिका असते.बाजार समितीने अभ्यास दौरे आयोजित करावे. बाजार समितीत विकास कामांना पणनने मंजुरी दिली नाही तर त्यासाठी न्यायालयात जावे लागते.निळवंडेचे पाणी सोडल्यानंतर जलपूजन व श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसून येते. मात्र या भागातील शेतकऱ्यांनी किती सात नंबरचे फॉर्म भरले हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यामुळे आगामी काळ संघर्षाचा असून हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे.अहवाल वाचन सचिव साहेबराव वाबळे यांनी केले.सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. यावेळी कांदा उत्पादक, भाजीपाला उत्पादक, व्यापारी, आडते,गाळेधारक यांचा मान्यवरांच्या हस्ते येथे गौरव करण्यात आला.
