श्रीरामपूर-नितीन शेळके
‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या विरोधकांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहेत.वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी अडचणीत येत राहिले.
विधिमंडळात रमी खेळण्याचा त्यांचा समोर आलेला कथित व्हिडीओ असो की आपल्याच कृषी खात्याला ‘ओसाड गावची पाटीलकी’ असे संबोधणे असो किंवा अगदी कालपरवा आपल्याच सरकारला ‘भिकारी’ म्हणून हिणवणे असो,कृषीमंत्री कोकाटे हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेच राहिले. त्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचिही चांगलीच नाराजी ओढवून घेतली. ती इतकी की कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामाच घेतला जाईल, आणि त्यांना दुसरे एखादे खाते दिले जाईल किंवा अगदीच जबाबदारीतुन ‘मोकळे’ केले जाईल इथपर्यंत चर्चा माध्यमातून रंगायला लागल्या. परंतु या सर्व वादग्रस्त घडामोडींनंतर खुद्द कृषीमंत्री कोकाटे यांनीच अजित पवार यांच्यापुढे पडदा टाकून दिलगिरी व्यक्त केल्याचे बोलले जाते.

त्यानंतर कोकाटे हे आज थेट मुंबईहून शनी देवगाव (ता. वैजापूर) येथे 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते. सहाजिकच कृषिमंत्री कोकाटे यांना पत्रकारांचा गराडा पडला. परंतु त्यांनी आज अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत मी महंत रामगिरी महाराज यांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी येथे आलो आहे आणि हा धार्मिक सोहळा आहे तेव्हा आपण (पत्रकार) मला त्याबद्दलच प्रश्न विचारा, अशी विनंती केली.यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, मागील वर्षी माझ्या मतदारसंघात पांचाळे येथे १७७ व्या सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. सालाबादप्रमाणे यंदा १७८ व्या सप्ताहासाठी मला महंत रामगिरी महाराज यांनी वैयक्तिक निमंत्रण दिले होते. त्यामुळे या ठिकाणी येणे क्रमप्राप्त होते.आमच्या वारकरी संप्रदायाचे सप्ताह हे श्रद्धास्थान आहे.लाखो भाविक याठिकाणी येतात.यास अनन्यसाधारण असे महत्व आहे.माझे येथे येणे झाले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.येथील आ. रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने नक्की यशस्वी होईल,असेही कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे शेवटी म्हणाले.
