श्रीरामपूर–
आंबी येथून पुण्याकडे निघालेल्या मायलेकांच्या मोटरसायकलला अचानक बिबट्याने जोरदार धडक दिल्याने दोघेही मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी झाले. या अपघातात सुदैवाने प्राणहानी टळली असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आंबी येथील अलका भगवान वायदंडे (वय ४५) आणि त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे (वय २८) हे पुणे येथे जाण्यासाठी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता मोटरसायकलने निघाले होते. दरम्यान, श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर त्यांच्या गाडीला अचानक एका बिबट्याने जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की या अपघातात बिबट्याही काही अंतरावर फेकला गेला, तर विशाल आणि अलका वायदंडे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर बिबट्या तात्काळ जवळील झुडपांमध्ये गायब झाला.जखमी मायलेक दोघांनाही तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मानवी वस्तीत बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याचहा वावर वाढल्याने त्यांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार कानावर पडत असताना बिबट्याने मोटारसायकलला धडक देण्याचाही घटना वरचेवर घडताना दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वनविभगाने तातडीने लक्ष घालत या भागात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
