श्रीरामपूर –
अपघात झाल्याचा बनाव करून जनरल इन्शुरन्स (विमा) कंपनीची आर्थिक लाभासाठी दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील दोन जणांवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वतःमोटारसायकलवरून पडलेला असताना दुसऱ्या मोटारसायकलची धडक बसून आपण जखमी झाल्याची खोटी माहिती देवून विमा कंपनीची फसवणूक केली म्हणून टाकळीभान येथील किरण अर्जुन वाकचौरे आणि अविनाश जगन्नाथ लोखंडे यांच्याविरोधात सदर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुझम्मिल शेख, व्यवसाय-आयसीआयसी लोमबार्ड सल्लागार, यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण सदर कंपनीत 2 वर्षापासून सल्लागार म्हणून काम करीत आहे. श्रीरामपूर न्यायालयात अपघातातील जखमी किरण अर्जुन वाकचौरे यांची इन्शुरन्स क्लेमची केस आहे.यात
मोटारसायकलचा अपघात होवून वाकचौरे हे जखमी झाल्याने 7 लाखांचा दावा त्यांनी दाखल केला होता. म्हणून सदर अपघाताची सत्यपडताळणी केली असता किरण वाकचौरे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सायं.६ वा. टाकळीभान येथून कांदा लिलाव पाहून मी घरी पायी जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलने मला धडक मारल्याने त्यात माझ्या उजव्या पायाला मार लागला. आपल्यावर शिरसाठ हॉस्पीटल येथे उपचार करण्यात आले. शिरसाठ हॉस्पीटल येथील जखमीच्या उपचारांच्या कागदपत्रांमध्ये व किरण वाकचौरे याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये ‘फॉल फ्रॉम मोटारसायकल’ असे दिसून आले. त्याचा अर्थ जखमी हे स्वतः मोटारसायकल चालवत असताना पडले. गाडीचालक स्वतः पडून जखमी झाल्यास इन्शुरन्स क्लेमसाठी पात्र ठरत नाही. असे असताना देखील फिर्याद देताना जखमी यांनी पायी चालत असल्याचे सांगितले व दुसऱ्या मोटारसायकलने आपल्याला धडक दिल्याचे नमूद केले. सदर मोटारसायकलच्या तांत्रिक तपासणीमध्ये मोटारसायकलची उजव्या बाजूची नंबरप्लेट वाकलेली होती. तसेच उजव्या बाजूचे भंपर घासलेले होते. तसेच जखमीच्याही उजव्या पायाला जखमी झालेली असल्याने जखमी वाकचौरे हे मोटारसायकलवरून पडून जखमी झाल्याचे स्पष्ट होते. अशा प्रकारे सदर वस्तुस्थिती लपवून आपल्याला दुसऱ्या मोटारसायकलने धडक मारल्याची खोटी माहिती देवून विमा कंपनीकडून आर्थिक लाभासाठी दिशाभूल करत कंपनीची फसवणूक केल्याचे शेख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून किरण अर्जुन वाकचौरे,अविनाश जगन्नाथ लोखंडे यांच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.
