श्रीरामपूर-
सावकारकीचा परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या सावकारकी करणाऱ्या बेलापूर येथील सुनिल मुथा व मनीष मुथा या दोघा बंधुवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील मुथ्था हे टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आहेत.
रोहीत संतोष भालेकर (रा. बेलापूर रोड, बजरंगनगर, वार्ड नं. ०७, श्रीरामपूर) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.गेल्या आठवड्यात शहर पोलिसांकडून बेलापूर येथील वाहन बाजारातील वाहनांची तपासणी करण्यात आली होती.या वाहनांची खात्री करत असताना तक्रारदार रोहीत संतोष भालेकर (रा. बेलापूर रोड, बजरंगनगर, वार्ड नं. ०७, श्रीरामपूर) यांनी दि. १४ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात मनीष मुथा व सुनिल मुथा यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी करुन त्यांची मोटरसायकल गहाण ठेवून घेतल्याबाबत तसेच ज्यादा व्याज व मुद्दलाची मागणी केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता.
या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, श्रीरामपूर) यांच्याशी पत्रव्यवहार करून मनीष मुथा व सुनिल मुथा यांच्याकडे सावकारी कर्ज देण्याबाबच्या परवाना आहे का? याबाबत विचारणा केली असता, सहाय्यक निबंधकांनी मनीष मुथा व सुनिल मुथा यांच्याकडे सावकारी कर्ज देण्याबाबच्या कोणताही परवाना नसल्याचे पत्राद्वारे कळविले होते. याप्रकरणी रोहीत संतोष भालेकर यांच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मनीष मुथा व सुनिल मुथा (दोघेही रा. बेलापूर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम
३०८ (२) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहे.अशाप्रकारे दुचाकी व चारचाकी वाहने अगर अन्य मालमत्ता बेकायदेशीरपणे तारण म्हणून ठेऊन, नियमबाह्य व्याज घेऊन बेकायदेशीर सावकारी कोणी करीत असल्यास त्याविरोधात तात्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
