श्रीरामपूर-
शहरातील भगतसिंग चौक परिसरात रविवारी (दि.१७ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या आठ वाहनांचे या टोळक्याने नुकसान केले.श्रीरामपूरात गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या टोळीयुध्दाशी या घटनेचा संबंध असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे.शहरात गुन्हेगारी घटनांची मालिकाच सुरू झाली असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पहाटे दोनच्या सुमारास सुमारे ८ ते १० जणांचा टोळक्याने धारदार शस्त्रांसह भगतसिंग चौक परिसरातील गाड्यांवर दगडफेक करत तीनचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या तर काही वाहनांचे नुकसान करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा संबंध नुकत्याच झालेल्या टोळीयुद्धाशी जोडला जात असून घटनेतील काही आरोपींच्या घराजवळच वाहनांची तोडफोड झाली आहे. पोलीस मदत केंद्राजवळ घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना लवकरच गजाआड केले जाईल. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.

