श्रीरामपूर-
शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची व तीन दुचाकींची तोडफोड करून एका दुचाकीतील बॅटरीची चोरी केली होती.याबाबत परिसरात राहणाऱ्याच एका व्यक्तीने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिर्डी पोलिसांनीही घटनेचे गंभीर्य लक्षत घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.पोलिसांनी या घटनेचा तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपासले व चार आरोपींना जेरबंद केले.दरम्यान बॅनर फाडणारे तसेच दुचाकींची नुकसान करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून पोलिसात जे फिर्याद देण्यासाठी आले तेच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे शिर्डीत घटनेनंतर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण काहीसे निवळण्यास मदत झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,लक्ष्मीनगर परिसरात गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांचे फोटो असलेले बॅनर लावले आहेत. त्यापैकी दोन बॅनर व त्या परिसरात उभ्या असणाऱ्या तीन दुचाकी मोटरसायकलची मोडतोड करून एका मोटरसायकलमधील बॅटरी चोरण्याची घटना रवीवारी मध्यरात्री घडली होती. सदर घटना घडल्याची फिर्याद विशाल राजेश अहिरे याने शिर्डी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवली.पुढे या गुन्हेतील चार आरोपींपैकी फिर्याद देणारा विशाल राजेश आहिरे राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी यानेच याच्या साथीदारासह हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.तसेच त्याने आपल्या गुन्ह्याची
कबुली पोलिसांना दिली. मुख्य आरोपी विशाल राजेश आहिरे, दिनेश दवेश गोफने व राकेश सोमनाथ शिलावट सर्वं राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी अशी या चार आरोपींची नावे आहेत.या चार आरोपीपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. सदर कृत्य हे त्यांनी त्यांच्या आपापसातील भांडणातून केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.शिर्डी पोलीस स्टेशनचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस उप निरीक्षक सागर काळे व पोलीस हे कॉ संदिप उदावंत, बाळासाहेब गोराने, केवल राजपूत, शेकडे यांनी घटनेचा तपास करून आरोपींना जेरबंद केले.
