श्रीरामपुर:
घरकामगार हे समाजातील एका मोठ्या उत्पादक वर्गाला सेवा पुरवतात. या प्रक्रियेत त्यांना जगण्यासाठी उत्पन्न मिळते. असंघटित क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा वर्ग असलेल्या घरकामगार महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या प्रचंड समस्या, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, कामाची अनिश्चितता आणि अत्यल्प वेतन अशा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या घरकामगार स्त्रिया आजही सामाजिक सुरक्षा पासून वंचित आहेत. त्यासाठी प्राध्यापक संभाजी पवार यांंच्या युवाग्राम विकास संस्था गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मजबुतीने कार्यरत आहे.त्यांचा कामाला आमचे सहकार्य व पाठबळ राहील असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेच्या बालभवन प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख यांनी केले.
श्रीरामपूर युवाग्राम विकास संस्था व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जून रोजी श्रीरामपूर येथे ‘घरेलू महिला कामगार संघटना कार्यशाळा’ घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर होते. याप्रसंगी युवाग्राम संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार,संचालक फिरोज शेख,अमोल सोनवणे, शायिस्ता शेख,अनिता शेलार,आदित्य पवार आदि मान्यवर ऊपस्थित होते.
युवाग्रामचे अध्यक्ष संभाजी पवार म्हणाले की,कोणतेही काम श्रेष्ठ दर्जाचे किंवा हलक्या प्रतीचे नसून, सर्व समान व एकमेकास पूरक आहे.हे जरी खरे असले तरी घरकाम करणाऱ्या घरेलू कामगार महिलांना समाजात फारच उपेक्षेने वागवले जाते. घरेलू कामगार महिला असंघटित क्षेत्रात काम करणा-या घरेलू कामगार महिलामध्ये एकजूट नसल्यामुळे ते आपल्या हक्काविषयी आणि अधिकाराविषयी जागृत नाही.त्यामुळे “ज्यांचे प्रश्न… त्यांचे नेतृत्व आणि त्यांचाच आवाज” या मुद्द्याला घेऊन संघटनात्मक बांधणी केली तर प्रश्न सुटण्यास मदत होईल,असे संभाजी पवार यांनी स्पष्ट केले.
जेष्ठ पत्रकार राजेद्र वाडेकर म्हणाले की, घरकामगार कोणाचे उपकार घेत नाहीत. तर तेही श्रमिक आहेत. त्यांचा आदर त्यांच्या हक्काचे रक्षण आणि त्यांच्या जीवनमानाचा विकास हा समाजाचा आणि शासनाचा दोघांच्या जबाबदारीचा भाग आहे. युवाग्राम संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे महत्व सांगून,प्रशिक्षण घेऊन प्रगती करण्याचे महिलांना आवाहन केले.
स्वागत शायिस्ता शेख, तर आभार अनिता शेलार यांनी मानले. सूत्रसंचलन अमोल सोनवणे यांनी केले.
……
फोटो –
श्रीरामपूर युवाग्राम विकास संस्था
व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे ‘घरेलू महिला कामगारांची कार्यशाळा’ घेण्यात आली.
Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह