मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ऐकून आनंदलेला श्रीरामपूर तालुका आणि उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा, जून संपता-संपता पावसाच्या गायब झाल्याने उदास आणि चिंतेत आहे.
श्रीरामपूर (प्रतिनिधी):
यंदाच्या वर्षी मान्सून सरासरी पेक्षा अधिक राहणार असल्याच्या हवामान अंदाजाने आनंदून गेलेला श्रीरामपूर तालुका तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा जून महिना संपता संपता पाऊसच गायब झाल्याच्या काळजीने काळवंडून गेल्याचे दुर्दैवी चित्र सध्या आहे.
गेल्या २० ते २५ दिवसांपासून मोठ्या पावसाने उघडीप दिली आहे.मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत ओल निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या होत्या.खरिप हंगामात आतापर्यंत ६५ टक्क्यांपर्यंत पेरण्या झालेल्या असून
यातील बहुतांश पिके आता माना टाकू लागली आहेत.कपाशी,मका,सोयाबीन आणि चारा पिकांची अवस्था पावसाअभावी वाईट झाली आहे.
दररोज सकाळपासून आभाळ भरून आलं की सोसाट्याचा वारा सुरू होतो.त्यामुळे पावसाचे जमा झालेले ढग वाऱ्याच्या बरोबरीने ओढले जाऊन श्रीरामपूर तालुका परिसर कोरडाठाक राहत आहे.
काही ठिकाणी शेतकरी भर पावसाळ्यात पिकांना पाणी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले थोडेफार पाणी देतांना दिसत आहे. जिल्ह्यात एक लाखांहून अधिक हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असून आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होणार आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाचे प्रमाण सुरवातीला अधिक होते. तर जिल्ह्याच्या उत्तर भागात जेमतेम पाऊस झाला.एकही मोठा पाऊस झाला नसल्याने त्या जेमतेम पावसावर पेरण्या केलेले शेतकरी आता संकटात सापडले आहेत.बळीराजा आता पावसासाठी देवाचा धावा करत आहे
शेतकरी वर्ग आता देवाकडे पावसासाठी साकडं घालत आहे.
बळीराजाची नजर आता आकाशाकडे, तर मनात प्रार्थना — “एकदाचा पाऊस पडो.”
Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह