श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पालिका कार्यालयासमोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी पाऊस कोसळला. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंडप सोडला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत एकाही पालिका अधिकऱ्याने आंदोलनाची दखल घेतली नाही.श्रीरामपूर नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनच्यावतीने हे आंदोलन सुरू आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दहा, वीस व तीस वर्षांनंतर अनुज्ञेय ठरणारी लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करून फरक अदा करावा, या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यींच्या एकाकी पदाची वेतन निश्चिती चुकीची केली आहे. त्यात दुरूस्ती करून वेतन निश्चिती करून देय रक्कमा त्वरीत दिल्या जाव्यात, अनेक कर्मचारी निवृत्त होऊन एक वर्ष होऊन गेले तरीही त्यांचे उपदान व सेवा निवृत्ती वेतन लागू केलेले नाही. अशा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू करावे, सेवा निवृत्तीनंतर तीन महिन्यांमध्येच सर्व देय रकमा अदा करून सेवा निवृत्ती वेतन लागू करणे आवश्यक असते. मात्र पालिका अधिकऱ्यांकडून दान वर्षे उलटूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आयुक्त कार्यालयास योग्य पाठपुरावा केला जात नाही. जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.या सर्व मागण्यांसदर्भात २ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रमेश अपिल, संजय आढाव, रावसाहेब काळे, भानुदास जाधव, विनोद चव्हान, भानुदास थोरात, बाळासाहेब जाधव, हिवराळे सुदामा, झुंगा शेळके, अनिल झिंगारे, बाळासाहेब चव्हान, चंद्रकांत सोनवणे, लताबाई जगधने, ताराबाई झिंगारे, माणिक जाधव, ज्ञानदेव आमराव, अनिल काजळे, नर्मदा सुरडकर, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

मुख्याधिकारी मागील दाराने…
दररोज दुपारी जेवनाच्या सुटीत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप हे पालिकेच्या समोरील बाजूने जात असतात. मात्र आंदोलनकर्ते पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेले होते.यावेळी मुख्याधिकारी यांनी पालिकेच्या मागील दाराने जाने पसंत केले. गेल्या अनेक दिवसांपासून हे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडत असून त्याची दखल घेतली जात नाही. उलट आंदोलनाकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून होत आहे.