श्रीरामपूर-
आदिवासी समाजाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे तुमच्या ताटातले काढून घेण्याचे काम सरकार अजिबात करणार नाही. तसेच राघोजी भांगरे आणि राया ठाकर यांच्या स्मारकांची दुरुस्ती करण्यासाठी जो निधी लागेल तो नक्की देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे काढण्यात आलेल्या आदिवासी समाजाच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन त्यानंतर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. या विराट रॅलीमध्ये ठिकठिकाणी फुले उधळून उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच जागोजागी लाडक्या बहिणींनी शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, डॉ.जालिंदर भोर, कमलाकर कोते, जगन देशमुख, बाळासाहेब भोर, सुशांत गजे, संजय वाघचौरे, शर्मिला येवले, संजय जाधव, जावेद जहागिरदार, सुभाष येवले, महेश देशमुख आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक मारुती मेंगाळ तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि आदिवासी बंधू भगिनी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,जागतिक आदिवासी दिन हा या समाजासाठी दसरा दिवाळीसारखा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मी इथे आलो आहे.आपली ही संस्कृती हाच आपला अभिमान आहे. त्याचे दर्शन आज इथे पहायला मिळाले. त्यामुळे आपल्याला थांबविणारी कोणतीही शक्ती नाही, असे यावेळी त्यांनी निक्षून सांगितले.विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आणि यांना (एकनाथ शिंदे) जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू हे सगळं ते बोलले. मात्र, माझ्या आदिवासी समाजातील लाडक्या बहिणींनी त्यांच्या चारी मुंड्या चित करून टाकल्या. महाविकास आघाडीला घरी पाठवून दिलं,” अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करुन दिली.
पक्षाचा मुख्य नेता म्हणून मारुती मेंगाळ यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असून त्यांना कोणतीही अडचण आल्यास नक्की दूर करू तसेच त्यांनी मागणी केल्यानुसार मालुंगे सोंगाळवाडी येथील प्रलंबित कामेही नक्की पूर्ण केली जातील, या वाडीचे नक्की पुनर्वसन केले जाईल. तसेच त्यांनी केलेल्या इतर मागण्यांवर शासनस्तरावर नक्की निर्णय घेऊ असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
