श्रीरामपूर-
बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार ‘मियावाकी’ या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांनी दिली.
मियावाकी वृक्षारोपण ही एक खास जपानी पद्धत आहे. जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत, स्थानिक झाडांच्या प्रजाती वापरून, नैसर्गिक वनीकरणाच्या तत्त्वांवर आधारित जंगल तयार केले जाते. एका चौरस मीटरमध्ये २ ते ४ झाडे लावली जातात ज्यामुळे झाडे एकमेकांशी स्पर्धा करून वाढतात. स्थानिक झाडांच्या प्रजाती वापरल्यामुळे नैसर्गिक अधिवास तयार होतो.कमी जागेत दाट आणि जलद वाढणारे जंगल तयार होते.या प्रकल्पांतर्गत वड,चिंच,जांभूळ,पिंपळ,आंबा,
डाळिंब, शेवगा,बेल,पेरु,सिताफळ,रातराणी,देवचाफा, बोगनवेल,मोगरा, पारिजातक,शमी आदि सावलीचे वृक्ष, फळझाडे,फुलझाडे आदिंची लागवड केली जाणार आहे. त्याच प्रमाणे ५ गुंठे क्षेत्रावर अडुळसा, शतावरी,तुळस यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींची देखील लागवड केली जाणार आहे. सदरचा प्रकल्प राबविणेसाठी श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के,कृषी अधिकारी उस्मान शेख, कृषी विस्तार अधिकारी सुवर्णा तोडमल व दीपक मेहरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.हा उपक्रम राबविणेसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे व बेलापूर ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी विशेष परिश्रम घेत असल्याची माहिती सरपंच सौ.साळवी व उपसरपंच श्री.नवले यांनी दिली.
