श्रीरामपूर-

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा.चेअरमन पदावर बाबासाहेब कडुजी आदिक यांची बिनविरोध निवड झाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन श्री.हिम्मतराव धुमाळ यांनी आपले पदाचा राजीनामा दिल्याने सदर पदासाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक (साखर), अहिल्यानगर श्री.संजय गोंदे यांचे अध्यक्षतेखाली कारखान्याच्या भास्करराव गलांडे पाटील सभागृहात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस कारखान्याचे चेअरमन माजी आ.श्री.भानुदास मुरकुटे यांचेसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. निवडी प्रसंगी व्हा.चेअरमन पदासाठी श्री.बाबासाहेब आदिक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी श्री.पुंजाहरी शिंदे यांचे सूचनेस श्री.भाऊसाहेब उंडे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर श्री.बाबासाहेब आदिक यांचा माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना श्री.मुरकुटे म्हणाले की, व्हा.चेअरमनपद हे दरवर्षी बदलण्यात येईल, असा सर्वानुमते निर्णय करणेत आला होता. त्याप्रमाणे एक वर्ष संपल्यानंतर श्री.हिम्मतराव धुमाळ यांनी आपले पदाचा राजीनामा दिला. श्री.धुमाळ यांनी वर्षभर अत्यंत जबाबदारीने काम केले. असेच काम नूतन व्हा.चेअरमन श्री.आदिक हेही करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक अधिकारी श्री.संजय गोंदे यांचेही त्यांनी आभार मानले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदी उपस्थित होते.