श्रीरामपूर-
जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचे कथित व्हिडीओ क्लिप प्रकरण हे ज्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले नाही तसेच या प्रकरणाच्या आडून विखे पाटील परिवाराला टार्गेट करता येईल, अशा काही पक्षांतर्गत आणि काही समदुखी लोकांनी रचलेले षडयंत्र आहे. त्यांची सर्वांची नावे मला माहिती आहेत,असे प्रतिपादन मा खा डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, भाजप मधील काही पक्षांतर्गत लोक पद मिळाली नाहीत म्हणून नाराज झालेले आहेत.ज्याला ते पद मिळालं नाही त्या समदुखी लोकांनी दिनकर यांच्या कथित व्हिडीओ क्लिपचे प्रकरण बाहेर काढले आणि ते भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या पर्यंत पोहचवले.जिल्हाध्यक्ष दिनकर यांनी त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.त्या प्रकरणाची वास्तविकता किती व तो प्रसंग काय आहे हे तेच योग्य पध्दतीने सांगू शकतील. परंतु हे कोणी केलं,यामागची नावं मला माहित आहे.योग्य वेळी त्या संबंधी सत्यता जनतेसमोर येईलच.राजकारणातील हा नवा फंडा (प्रकार) सध्या दिसून येत आहे. पक्षांतर्गत कुरघोडी करण्यासाठी अशा प्रकारे या गोष्टींचा वापर होणे हे नवीनच दिसत आहे.काही लोकांना विखे पाटील परिवाराचा राग आहे.त्यांच्या बद्दल या लोकांच्या मनात असूया आहे.त्यांनीही दिनकर यांच्या आडून विखे पाटील परिवाराला टार्गेट करण्यासाठी हे केलं असावे असेही मला वाटते.कारण शेवटी सगळे समदुखी एकच असतात. काही जण तालुकाध्यक्ष होता आले नाही म्हणून दुःखी आहेत तर काही जण जिल्हाध्यक्ष होता आले नाही म्हणून दुःखी आहेत.काही जणांना आमच्यामुळे वेगवेगळ्या निवडणुकांत यश मिळाले नाही म्हणून ते दुःखी आहेत.असे हे सगळे एकत्र येऊन या पद्धतीचे प्रकार करू पाहत आहेत.आता या गोष्टींवर माझी आता पीएचडी झाली आहे. या प्रकरणातली नावही मला माहिती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे ती आपण मांडू,असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्याकडे नितीन दिनकर यांच्याबाबतचे ‘हे’ साहित्य पोहचविण्याचे काम याच पक्षांतर्गत समदुखी लोकांनी केलं आहे.कदाचित देसाई यांनाही चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवण्यात आली असावी असे माझे वैयक्तीक मत आहे.असे असले तरी ही सगळी बाब आता वरीष्ठ पातळीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे आहे.पक्षश्रेष्ठी या गोष्टीवर गंभीरपणे विचार करत आहेत.ते दोनही बाजू ऐकून घेतील आणि त्यावर योग्य निर्णय घेतील.अहिल्यानगर चे जिल्हाध्यक्ष म्हणून नितीन दिनकर यांचे काम उत्तमपणे सुरू आहे आणि पुढेही ते सुरू राहील असा मला विश्वास आहे,असेही डॉ.सुजय विखे पाटील शेवटी म्हणाले.
