श्रीरामपूर-
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर ते अहिल्यानगर दरम्यानच्या मार्गाच्या तसेच
शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,अशी माहिती अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या नगर-मनमाड महामार्ग आणि शेवगाव बायपास रस्त्याच्या प्रलंबित कामासंबंधी गुरुवार दि.10 रोजी दुपारी मंत्रालयात ही आढावा बैठक संपन्न झाली. अहिल्यानगर ते सावळी विहीर या महामार्गाच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. ५१५ कोटी रुपयांचा निधीही देण्यात आलेला आहे. आता हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना या बैठकीत मंत्रीमहोदयांनी दिल्या आहेत.
सदर बैठकीत शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. सदर मार्ग चौपदरी होण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे.अंत्यत महत्वाच्या या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्ती होण्याची प्रतीक्षा वाहनधारक व जिल्ह्यातील नागरीकांना होती.निविदा प्रक्रिया होऊन सदर मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
