श्रीरामपूर :
सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच अत्यंत भव्य आणि अभिनव पद्धतीने ‘शारदा थ्रोबॉल लीग २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचण्यांनंतर ८ संघांची घोषणा करण्यात आली असून, एकूण १०४ विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.महाराष्ट्रातील पहिल्यांदाच ६ मुले आणि ३ मुली अशा संमिश्र संघरचनेत ही थ्रोबॉल स्पर्धा खेळवली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी १२ जुलै २०२५ रोजी शनिवारी, श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर हा थरारक थ्रोबॉल महोत्सव पार पडणार आहे.
स्पर्धेसाठी एकूण ११० विद्यार्थ्यांनी निवड चाचण्यांमध्ये सहभाग नोंदवला, त्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १०४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रत्येक सामन्यासाठी “मॅन ऑफ द मॅच” ट्रॉफी तसेच विजेत्या संघासाठी आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. ही ट्रॉफी श्री. सागर रमेश भड यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नाथाली फर्नांडिस तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.खेळाच्या माध्यमातून नेतृत्वगुण,सामूहिक विचारशक्ती,खेळातील शिस्त, आणि आरोग्यदृष्ट्या सकारात्मक सवयी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार आहेत.संमिश्र संघ रचनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये समता,सहकार्य आणि परस्पर सन्मानाची भावना रुजेल.यासोबतच,नेतृत्वाची संधी मुलींना देखील उपलब्ध करून देत शाळेने स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श घालून दिला आहे.

आत्मविश्वासाने भरलेले नागरिक घडवण्याचं ध्येय ..!
थ्रोबॉलच्या मैदानावरून केवळ स्पर्धक नव्हे तर उद्याचे शिस्तप्रिय, संघभावना आणि आत्मविश्वासाने भरलेले नागरिक घडवण्याचं ध्येय आहे.शारदा थ्रोबॉल लीगच्या माध्यमातून आम्ही याच दिशेने पाऊल टाकत आहोत.
-गौरव डेंगळे, क्रीडा मार्गदर्शक