श्रीरामपूर :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी असतानाही शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मार्केटमध्ये घाईघाईत बसविण्याचा जो प्रयत्न केला गेला तो बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर पुतळा बसविणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या आशयाचे प्रशासनाला आम्ही लवकरच निवेदन देऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी दिली.
प्रकाश चित्ते यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्या पत्रकार परिषदेत भाजपाचे शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे, संजय पांडे, सुरेश सोनवणे, अभिजीत कुलकर्णी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री चित्ते म्हणाले की, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाहेरून श्रीरामपूरात पाठवलेले त्यांचे हस्तक यांनी केलेले घाणेरडे व घृणस्पद कृत्य लपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाचा गैरवापर केला जात आहे.त्याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती. पालकमंत्री नामदार विखे व महंत रामगिरी महाराज त्यांच्या हस्ते शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा घाट घालण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये नगरपरिषदेच्या प्रस्तावा नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाची 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार आधीच परवानगी मिळालेली होती. तरीही मुस्लिम मतांच्या टक्क्यासाठी हा पुतळा शिवाजी चौकात न बसवता नेहरू भाजी मार्केट परिसरात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नेहरू भाजी मार्केटमध्ये जागेत पुतळा बसविण्यात आला तो बेकायदेशीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसण्याची बांधकाम विभागाची परवानगी असताना ती परवानगी लपविण्यात आली. प्रशासनाने ही परवानगी नाकारून बेकायदेशीरपणे जागेत पुतळा बसविण्यात आला. बेकायदेशीरपणे पुतळा बसविण्यास कारणीभूत असलेल्या सर्वच लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम्ही प्रशासनाला देणार आहोत. भविष्यात आमची सत्ता आली तर आम्ही हा पुतळा पुन्हा शिवाजी चौकात स्थलांतरित करू असे आश्वासने श्री चित्ते यांनी दिले.
यावेळी बोलताना राजेंद्र कांबळे म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी आमची मागणी ठाम असताना त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी आम्हाला आवाहन केले होते की जर सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी दिली तर हा पुतळा शिवाजी चौकात बसविण्यास आमचा पाठिंबा राहील.शिवाजी चौकात पुतळा बसविणे बाबत चा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘ना हरकत’ दाखला आलेला आहे.भाजप शहराध्यक्ष छाजेड यांना आमचे आव्हान आहे की,आता हा पुतळा शिवाजी चौकात तुम्ही बसविणार का? असाही सवाल राजेंद्र कांबळे यांनी शेवटी केला.
