श्रीरामपूर-
शेताच्या वाटणीच्या कारणावरून शिरसगाव येथे एका जणास डोक्याला पिस्तूल लावून चारचाकी वाहनात बसून नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेत पांडुरंग भास्कर गवारे, वय-४८ हे जखमी झाले असून याप्रकरणी ५ जणांसह चार ते पाच अनोळखी इसमांविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पांडुरंग भास्कर गवारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा सावत्र भाऊ आबासाहेब गवारे याच्याशी शेताच्या वाटण्याच्या कारणावरून कोर्टात वाद सुरू आहे. आपण घटनेच्या दिवशी शेतात असताना तेथे माझ्या ओळखीचा रोहीत दिनकर यादव व त्याच्यासोबत इतर अनोळखी चार इसम आले. तेव्हा रोहीत यादव म्हणाला की, आपले जे जमिनीचे वाद आहेत ते सर्वजण बसून मिटवू. त्यावेळी त्याने कंबरेला असलेले पिस्तूल आपल्या डोक्याला लावले व त्यांनी आमच्याबरोबर चल नाहीतर गोळी घालून मारून टाकू, अशी धमकी दिली.त्यानंतर चारचाकी वाहनातून खंडाळ्याजवळ एमआयडीसी येथील एका कारखान्यात नेले. तेथे आपल्याला हातपाय बांधून तोंडात मारत मागील २० वर्षांपासून आमची शेतजमीन खात आहे, कोर्टातील अपील मागे घे नाहीतर तुला रेल्वे रुळावर टाकून देऊ, असे धमकावले व लाकडी दांड्याने तसेच लोखंडी गजाने मारहाण केली. त्यानंतर एकाने आपला गळा दाबत तू राहत असलेले घर खाली कर, तेथून निघून जा नाहीतर कुटूंबाला जिवे ठार मारू,अशी धमकी देत पुन्हा चारचाकी
वाहनात बसवून घराशेजारी रोडवर आपल्याला फेकून देत आरोपी तेथून निघून गेले. पांडुरंग गवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहीत दिनकर यादव, दिनकर माधव यादव, आप्पासाहेब भास्कर गवारे, प्रमिला भास्कर गवारे, शितल आबासाहेब गवारे व इतर चार ते पाच अनोळखी इसम यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत
