श्रीरामपूर-
कांदा काढणी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने टाकळीभान उपबाजार आवारात दिनांक ९ मे २०२६ पासून लूज कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, हमाल व मापाडी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कांदा खरेदी-विक्री प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत करण्यावर भर देण्यात आला. अलीकडील काळात काही शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे बुडाल्याच्या घटना लक्षात घेता, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
बाजार समितीचे सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, शेतकऱ्यांनी आपला कांदा शेतावरच विक्री न करता बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात विक्रीसाठी आणावा, जेणेकरून व्यवहार सुरक्षित होतील.
या बैठकीस संचालक सचिन गुजर, राजेंद्र पाऊलबुद्धे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, मयूर पटारे, श्रीमती विद्याताई दाभाडे, राजू चक्रनारायण यांच्यासह व्यापारी, हमाल व मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या उत्पादनाला योग्य दर व सुरक्षित व्यवहाराची हमी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
