श्रीरामपूर-
नायगाव येथे घडलेल्या निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणातश्रीरामपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांना राजकीय द्वेषातून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करत आज त्यांच्या हजारो समर्थकांनी शहरातून मोर्चा काढत या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करावा व अर्जुन दाभाडे यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळावे अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या.
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी नायगाव येथे निलेश शेंडगे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात नगरसेवक अर्जुन दाभाडे यांच्यासह इतर काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय वैमनस्य असून दाभाडे यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
आज काढण्यात आलेल्या या मोर्चात शहरातील विविध भागांतील शेकडो महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “अन्याय सहन करणार नाही”, “दाभाडेंना न्याय द्या”, “खोटे गुन्हे मागे घ्या” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ आणि पोलीस उपनिरीक्षक राम शिखरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. या निवेदनामध्ये निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने व्हावा, खऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, मात्र केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन अर्जुन दाभाडे यांच्यावर लादलेले खोटे आरोप व गुन्ह्यातील त्यांचे नाव तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी केली आहे. तसेच, मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास पुढील काळात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समर्थकांकडून देण्यात आला.
या मोर्चात राज चव्हाण, धनश्री दाभाडे, संचिता नरोटे, आरती धुमाळ, सोनाली ठमके, अरुणा ठमके, समीक्षा कांबळे, माया रिल, बाळासाहेब गाडेकर, हनिफ पठाण, वसला पवार, विठ्ठाबाई रननवरे, सोनू वेरागर यांच्यासह शहर व परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
