श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज दि. ०२ रोजी अत्यंत उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली.मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली.नऊ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या नगरपालिका निवडणूकीमुळे शहरातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.त्यामुळे नगरपालिकेसाठी सुमारे 72 टक्के इतके मतदान झाले.शहरातील अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरानंतरही लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.दरम्यान ‘लक्ष्मीदर्शना’च्या योगामुळे मतदानाचा टक्का वाढणार असल्याचीही चर्चा आहे.
प्रभाग सहासाठी संजयनगर परिसरातील अनिल मुळे शाळेमध्ये मतदान केंद्रांवर मतदार यादीमध्ये अनुक्रमांकाचा गोंधळ झाल्याने सर्वच मतदारांना मनस्ताप झाला.आपला नंबर कोणत्या यादीत आहे हे मतदारांना माहित होत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रभागातील सर्वच मतदान केंद्रामध्ये जावे लागले.मतदान अधिकारी व कर्मचारी यांना देखील मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
दुपारी एक नंतर बऱ्याच मतदारांना मतदान केंद्राच्या बाहेर उन्हात उभे राहावे लागले. श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी शाळेतही परिस्थिती दिसून आली.दुपारी प्रभाग पाच,सात, आठ आणि मिल्लतनगर, संजय नगर परिसरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या होत्या.
शाळा क्रमांक सहा मधील प्रभाग सातच्या मतदान केंद्रांवर दुपारी पोलिस व कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तसेच दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.
नवीन मराठी शाळेमध्ये प्रभाग बारा च्या मतदान केंद्रांवर दोन महिला उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने दोन्हीकडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यावेळी तातडीने पोलीस कुमक मागवून जमाव पांगवण्यात आला.
१३५ सीसीटीव्ही कॅमेरे लाऊन शहरातील सर्व ८९ मतदान केंद्रांवर करडी नजर ठेवली जात होती व त्याचे नियंत्रण तहसील कार्यालयातून केले जात होते.ज्या ठिकाणाहून तक्रार प्राप्त होत होती त्या ठिकाणी तातडीने बदल करण्यात येत होते.शहरातील एक दोन मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्यामध्ये मतदान केंद्राच्या बाहेर वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता एकंदरीत मतदान शांततेत पार पडले.

पोलीस बंदोबस्तही चोख होता.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मतदान केंद्राना कडक पहारा होता. सर्व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला.त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसण्यासाठी मोठी मदत होऊन मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत होती.पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या तुकड्या व होमगार्ड तैनात करण्यात आले होते.
सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र थंडीमुळे मतदार बाहेर पडले नाहीत.त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद होता. दुपारी 12 वाजेनंतर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र होते.
सकाळी 11.30 वाजेपर्यंत फक्त 15.80 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढल्याने 3.30 वाजेपर्यंत 43.75 टक्के इतके मतदान झाले होते.त्यांनंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56 टक्क्यांच्या पुढे मतदानाचा आकडा गेला.शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.रात्री उशिरापर्यंत तेथे मतदान सुरू होते.प्रशासनाकडून ही बाब गृहीत धरून प्रत्येक ठिकाणी विजेची आणि इतर सोय करण्यात आली होती.
अनेक मतदान केंद्रावरील वाढलेल्या मतदारांच्या गर्दीमुळे सुमारे 72 टक्क्यांच्यावर एकूण मतदानाचा आकडा जाणार असल्याचे निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप, कंट्रोल रूम इन्चार्ज तथा तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे, इंजिनियर पुरण धांडे, वरिष्ठ लिपिक प्रमोद माने, नेटवर्क इंजिनियर राजेश कवाने, अरुण लांडे, ओम खुपसे, संदीप पाळंदे, सिद्धार्थ गवारे, आसमा शेख, प्राची जैत आदींनी चोखपणे निवडणूक प्रक्रिया हाताळली.
दरम्यान आज नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये कैद होणार असून आता 21 डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

श्रीरामपूरकरांचा कौल कुणाला..?
श्रीरामपूरच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे करण ससाणे,भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, शिवसेनेकडून प्रकाश चित्ते हे तर उबाठा सेनेकडून अशोक थोरे हे आपले नशीब आजमावत आहेत.श्रीरामपुरकरांनी कुणाच्या पारड्यात आपले मत टाकले याचा फैसला 21 डिसेंबर लाच होणार आहे.