श्रीरामपूर-
भूमाता महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माझ्यावर महिलांबाबत केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे,असे स्पष्ट करत भाजप चे अहिल्यानगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
जिल्हाध्यक्ष दिनकर पुढे म्हणाले की, ज्या पदाधिकारी महिलांच्या व्हीडियो बाबत देसाई आरोप करत आहेत तो व्हिडीओ 16 मे 2024 चा म्हणजे 14 महिन्यापूर्वीचा असून माझ्या सोशल नेटवर्किंग आकाउंटवर तो उपलब्ध आहे.माझ्या नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीचा तो व्हिडीओ आहे.त्यावेळी माझ्या समवेत श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी,उद्योजक व काही राजकीय मंडळी देखील होती.तसेच आपण कुठल्याही महिला पदाधिकारी यांना पदे देण्याच्या आमिषाने कुठेही बोलावलेले नाही.देसाई यांच्याकडे तक्रार करणाऱ्या महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी.हा सर्व माझ्या बदनामीचा प्रकार असून मी स्वतः या विरोधात पोलिसांत जाऊन फिर्याद देणार आहे. तसेच तृप्ती देसाई व संबंधितांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे देखील जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी शेवटी सांगितले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावरील देसाई व महिलांच्य या आरोपांनी श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा गरम झाले आहे.