श्रीरामपूर:
अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्यासोबत महिलांबरोबर नाचत असतानाचा एक व्हिडिओ देखील देसाई यांना महिलांनी पाठवला आहे. याबाबतची माहिती स्वतः तृप्ती देसाई यांनी समाजमाध्यमात दिली आहे.देसाई यांचा तो व्हिडीओ आज मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यात देसाई यांनी म्हटले की भाजप च्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्या तक्रारीत या महिलांनी म्हटले की,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हे आम्हाला पक्षात पदे मिळवून देण्याच्या आमिषाने रात्री उशिरापर्यंत धाब्यावर बोलावून घेवून तिथे थांबवणे, दारू पिऊन नाचायला लावणे व पार्ट्या करणे अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करायला लावत आहेत.तसेच दिनकर यांना असलेल्या पोलीस संरक्षणाचा वापर ते दहशत निर्माण करण्यासाठी करतात.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते जवळचे असल्याने त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याचे धाडस करत नाही.असे धाडस कुणी केलेच तर त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे काम ते करतात,असे या पदाधिकारी महिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षच जर महिलांना अशी वागणूक देणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेणे गरजेचे आहे.आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करणे सुद्धा गरजेचे आहे,असे या तक्रारीच्या अनुषंगाने तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सभापती राम शिंदे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी अशीही विनंती त्यांना केल्याचे तृप्ती देसाई यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराने अहिल्यानगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.