श्रीरामपूर-
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटींच्या मदतिचे पॅकेज जाहीर केले.वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे.आजपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीसाठी एवढी मोठी भरीव मदत यापूर्वी कधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजाला उभारी मिळाली आहे. ही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरेल, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बांद्रे यांनी केले आहे.
बांद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,
केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे बळीराजाच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक राहिलेले आहे.राज्यात दि.13 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. खरीप हंगामातील सोयाबीन,कपाशी,मका तूर, उडीद व इतर कापणीसाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी हवालदील झाला. कुणाची पिके वाहीली तर कुणाची जनावरे मृत्युमुखी पडली. कुणाची घरी पडली तर कुणाची शेतीत खरडून वाहून गेली. काहींच्या विहिरींची पडझड झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लोणी येथील दौऱ्यात खुद्द शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे महायुती सरकारने भरीव मदत जाहीर केली.तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला पद्मश्री डॉ.विखे साखर कारखान्याच्यावतीनेही एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्याबद्दलही भाजप किसान मोर्चाच्या वतीने बांद्रे यांनी आभार मानले आहेत.
