श्रीरामपूर-
राज्यात कुठल्याही क्षणी नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू झालेली असून आज राज्यातील नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षण सोडतीही जाहीर करण्यात आल्या आहेत.यापूर्वीच प्रभागरचना जाहीर करण्यात आल्या होत्या.आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असल्याने निवडणूकीची रणधुमाळी सुरू होईल. आज मुंबई येथे जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचेही आरक्षणही जाहीर झाले आहे. 2006 नंतर यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे.सर्वसाधारण गटासाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने श्रीरामपूर शहरातील सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र आहे.थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार असल्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची आणि रंगतदार ठरणार आहे.महायुती आणि महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रच लढतील अशी चर्चा सुरू असली तरी ऐनवेळी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे ‘आपण आपले तयारीत राहिलेले बरे’ असाच काहीसा सर्व प्रमुख इच्छुकांचा होरा दिसून येत आहे.त्यामुळे सर्वांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.आतापर्यंत तरी महायुती व महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याच्या अनुषंगानेच तयारी केलेली दिसत आहे. तसा दावा वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. परंतु अद्याप याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
दरम्यान श्रीरामपूरात नगराध्यक्षपदासाठी अनेक पक्षाचे दिग्गज इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. यात मा. नगराध्यक्षा अनुराधा अदिक,मा. नगराध्यक्ष संजय फंड, मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा. उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी,मा. उपनगराध्यक्ष अंजूम शेख,भाजपचे प्रकाश चित्ते,शिवसेनेचे सागर बेग,राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक कानडे यांच्यासह अनेक इच्छुकांची नावे सध्या चर्चेत आहेत.मा. आ. भानुदास मुरकुटे यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.मागील नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याची संधी स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांना शहरातील मतदारांनी दिली होती.यावेळच्या निवडणुकीत मात्र परिस्थिती बरीच वेगळी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत मतविभागणीमुळे काँग्रेसचे आ.हेमंत ओगले हे विजयी झाले असले तरी श्रीरामपूरात हिंदुत्ववादी मतांचा वाढलेला टक्का,राज्यात आणि केंद्रात असलेली भाजपप्रणित सत्ता,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहर व तालुक्यात केलेली विकासकामे,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली ताकदीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.स्व.जयंतराव ससाणे यांना मानणारा शहरातील मतदार आणि काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक, शिवसेना ठाकरे गटाची ताकद नगराध्यक्षपदाच्या निवडणूकित निर्णायक ठरणार आहेत.या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील जनता कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकते आणि नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होण्याची संधी कुणाला देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
