श्रीरामपूर-
प्रकाश चित्ते यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संपूर्ण घटनाक्रमाची सखोल आणि सर्वंकष चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाचे नेते सुनील मुथा यांच्यासह प्रकाश चित्ते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या भेटीत चित्ते व मुथा यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले की, संबंधित फिर्यादीने प्रथम रात्री पावणेआठ वाजता दिलेल्या एनसीमध्ये जातीयवाचक शब्दांचा उल्लेख नव्हता. मात्र, रात्री एक वाजता दाखल झालेल्या दुसऱ्या फिर्यादीत आठ-दहा दिवसांपूर्वीच्या काल्पनिक घटनांचा उल्लेख करून जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या विसंगतींवर कोणतीही शहानिशा न करता तातडीने ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रकाश चित्ते म्हणाले की, ही कारवाई राजकीय द्वेषातून आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली झाली आहे. मी श्रीरामपूरमध्ये तसेच नगर जिल्ह्यातील सत्ताधारी असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळे मला थांबविण्यासाठी आणि माझे राजकीय आयुष्य संपविण्यासाठीच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात फिर्यादीतील घटनेप्रमाणे कोणतीही घटना घडलेली नाही.”प्रकरणाची वस्तुनिष्ठ व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी केली.
