श्रीरामपूर-
सराफ व्यापाऱ्याचे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथुन त्याच्या ड्रायव्हरने सव्वा तीन कोटी रुपयांचे दागिने चोरून नेले होते.त्यातील अडीच कोटींचे दागिने यापूर्वीच पोलिसांनी हस्तगत केले होते.उर्वरित 37,18,870/- रुपये किमतीचे 391.460 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने
आरोपीच्या राजस्थान येथील शेतातील घरातुन जप्त करण्यात आले आहेत.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी, वय 35, धंदा सोने व्यापारी, रा. आवाल घुमटी, ता. अमिरगढ, जि. बनासकाटा, गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यवसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले. दि.13/05/2025 रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा. चौहटन, जि. बारमेर, राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हर 3,26,00,000/- रू किंमतीचे दागीने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला. याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 532/2025 बीएनएस कलम 306, 316 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या पथकाने वर नमुद गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित 34 वर्षे, रा. चौहटन, जिल्हा बारमेर, राजस्थान यास तलोद, जि. साबरकाठा, गुजरात येथुन ताब्यात घेवुन त्यास शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले होते. सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोउपनि/ निवांत जाधव यांनी दिनांक 17/08/2025 रोजी अटक आरोपी यास न्यायालयात हजर करुन त्याची 6 दिवस पोलीस कस्टडी घेतली होती.पोलीस कस्टडीत आरोपीकडे सखोल तपास करुन दिनांक 20/08/2025 रोजी गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमाल हा आरोपीचे मुळ गावी इब्रे का ताला, ता. चौहटन, जिल्हा बारमेर, राजस्थान येथील शेतातील घरातुन 37,18,870/- रुपये किमतीचे 391.460 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहेत.सदर गुन्ह्यामध्ये यापुर्वी 2,55,34,527/-रुपये किमतीचे 2738.646 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व दिनांक 20/08/2025 रोजी 37,18,870/- रुपये किमतीचे 391.460 ग्रॅम सोन्याचे दागिणे असा एकुण 2,92,53,397/-रुपये किमतीचे 3130.106 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहे.सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार कबाडी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पो. नि. रणजिंत गलांडे, पोउपनि/ निवांत जाधव, पोकॉ/विजय धनेधर, पोकॉ/केवलसिंह राजपुत यांनी केलेली आहे.
