श्रीरामपूर-नितीन शेळके
विधानसभा निवडणुकीपासून श्रीरामपूर तालुक्याचे राजकारण जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरले.
इथल्या राजकीय उलथापालथीने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.आताही नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्यामुळे राजकीय प्रतिस्पर्ध्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.भाजप-शिवसेना (दोन्ही गट)-राष्ट्रवादी (दोन्ही गट)-काँग्रेस या सर्वच पक्षांमध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत एकसंघ दिसत असताना महायुतीत मात्र नगराध्यक्ष पदावरून चांगलीच धुसफूस आहे.त्यामुळे महायुतीत इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.त्यातून युतीला गतबाजीचा धोका संभवतो. महायुती म्हणून भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढल्यास नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे नाव सद्यस्थितीत आघाडीवर आहे.एक दोन दिवसात दोन्ही पक्षाचे शिरस्थ नेते यावर अंतिम चर्चा करून निर्णय घेणार असून नगरसेवकपदांच्या जागांबाबतही यात चर्चा होईल असे सांगण्यात आले.तसेच पुढील काळात स्थानिक पातळीवर चर्चा करायची झाल्यास दोन्ही पक्षांकडून समन्वयक नेमण्यात येणार असल्याचे समजते.भाजपतील काही नगरसेवकांचा मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा कल असून तसे झाल्यास श्रीनिवास बिहाणी हे भाजपकडून नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार असतील.बिहाणी हे सर्वच आघाड्या संभाळण्यास ‘समर्थ’ असल्याने त्यांच्या नावाला भाजपतुन पसंती आहे. मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यापुढे मात्र या सर्व घडामोडिंमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
काल राष्ट्रवादीच्या प्रमुख इच्छुक माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत सुजय विखे यांची भेट घेतली.त्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकिवर बराच खल झाला.त्या चर्चेत आदिक यांनी निवडणूकित सर्व समाजघटकांना बरोबर घेत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग राबविण्यावर जोर दिला.सुजय विखे हेही आदिक यांच्यासाठी अनुकूल वाटत असले तरी अंतिम निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच घेणार आहेत.
शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तशी तयारी करा’ असा सर्व प्रमुख नेत्यांना शब्द दिल्याचे बोलले जात आहे.त्यादृष्टीने शिवसेनेची तयारी सुरू आहे.मा. खा. सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या.भाजप पक्षातून बडतर्फ झालेले प्रकाश चित्ते यांनी नुकताच शिवेसेनेत प्रवेश केला.त्यांना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे.त्यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर असले तरी पक्षातील मा.आ.भानुदास मुरकुटे यांच्या स्नुषा मंजुश्री मुरकुटे, सागर बेग व संजय छल्लारे हेही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.त्यामुळे शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा मोठा धोका दिसत आहे.शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत हे नुकतेच श्रीरामपूरात येऊन गेले. त्यांनी मुरकुटे व चित्ते यांच्या निवासस्थानी येथील कार्यक्रमानंतर भेट दिली होती. त्यावेळी त्यांनीही गटबाजी न करता महायुती देईल त्या उमेदवाराचे काम करा अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत.त्या सूचना कितपत पाळल्या जातात हे निवडणूक काळात दिसेल.
काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे हेच उमेदवार असणार आहेत.काही अपवाद झाल्यास त्यांच्या जागी घरातील दुसरा उमेदवार रिंगणात दिसू शकेल.उबाठा सेनेतही अनेक इच्छुक आहेत, परंतु आघाडी म्हणून निवडणूक लढवताना काँग्रेसकडेच ही जागा राहील हे निश्चित दिसते.त्यामुळे पुन्हा एकदा सन २०१६ मध्ये नगराध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीप्रमाणेच लढत श्रीरामपूरात पाहायला मिळते का, याची उत्सुकता आहे.२०१६ मध्ये (स्व.) जयंत ससाणे यांच्या सुमारे २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादीच्या अनुराधा आदिक नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या.त्यांनी त्यावेळी राजश्री ससाणे यांचा पराभव केला होता. शहरात नुकताच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावर समारंभ झाला.या समारंभातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली आगामी काळातली रणनीती स्पष्ट केल्याचे दिसते. श्रीरामपूरातील विकास कामांना निधी देताना ते हात आखडता घेत नाहीत.भाजपकडून ही नगरपालिका निवडणूक कधी नव्हे इतकी प्रतिष्ठेची केली गेली आहे.त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत चुरस पहायला मिळणार आहे.गेल्या चार वर्षांपासून असलेली नगरपालिका निवडणुकीची प्रतिक्षा या निमित्ताने संपली असल्याने सर्वच प्रमुख इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
