श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या ‘भाई व दादा’ यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी आपला दंडुका उगारला आणि पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले.अशाच एका सराईत आरोपीची श्रीरामपूर शहर पोलिसांनी धिंड काढत त्याला शहरभर मिरवले.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक 22/3/2026 रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सरफराज बाबा शेख हा बिफ मार्केट, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर या ठिकाणी त्याच्या हातात गावठी कट्टा घेऊन लोकांना धमकावत असून दहशत निर्माण करत होता.त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. सदर सर्फराज शेख हा ईदगाह मैदान,वार्ड नंबर एक,श्रीरामपूर या ठिकाणी मिळून आला.त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळून आले. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु र नंबर 207/2026 शस्त्र (सुधारणा) अधिनियम 2019 चे कलम 3,7, 25, 25(6),(7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आरोपी सर्फराज बाबा शेख यास अटक करण्यात आली होती.त्यानंतर रात्री उशिरा साबीर शब्बीर कुरेशी हा पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने तक्रार दिली की,संध्याकाळी १८.०० वाजताच्या सुमारास तो बिफ मार्केट श्रीरामपूर येथे त्याचे स्विफ्ट कारने जात असताना असताना सरफराज बाबा शेख,इरफान मैनुद्दीन शेख, लुकमान इसाक शहा,राहुल सोनवणे अशांनी त्याची कार अडवून,कोयत्याचा धाक दाखवू, पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली. त्याने खंडणी देण्यास नकार दिला असता इरफान मैनुद्दीन शेख याने त्याचे डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला असता साबीर यांनी तो वार चुकवला.त्यावेळी इतर आरोपींनी ही त्यास मारहाण केली.या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर 208/2026 बी.एन.एस कलम 109,189(2),308(2),
126(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात सध्या सर्फराज शेख यास अटक केली आहे व तो पोलीस कस्टडी मध्ये आहे.सर्फराज शेखवर गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल असून नागरिकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याची दहशत मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या भागात त्याची दादागिरी आहे त्याच भागात त्याची धिंड आज काढली.पोलिसांच्या या कृतीचे सर्वसामान्य नागरिकांतून स्वागत केले जात आहे.
