श्रीरामपूर-
बेकायदेशिररित्या सावकारकी केल्याच्या आरोपाखाली बेलापूर येथील सुनील मुथ्था आणि त्यांच्या मुलावर सावकारकीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.सतीश दगडू भालेराव, रा.गोंधवणीरोड, वॉर्डनं. १, श्रीरामपूर यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून सुनील मुथ्था आणि त्यांचा मुलगा (नाव माहीत नाही), रा. बेलापूर यांच्याविरूद्ध गु.र.क्र. १०८३/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३०८(४), ११५ (२), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत कलम ३९, ४४ व ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ लाख रूपये व्याजाने घेतल्यानंतर त्याबदल्यात ७ लाख रूपये मुद्दल आणि व्याज देवूनही पुन्हा ५ लाख ४० हजार रूपयांची मागणी सुनील मुथा हे करत होते.सतीश दगडू भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण फायनान्सने महिन्द्रा कंपनीची बोलेरो गाडी घेतलेली होती. सदर गाडीचे कर्ज आपण फेडले. नंतर पैशांच्या अडचणीमुळे दवाखान्यासाठी पैशांची गरज असल्याने बेलापूर येथील सुनील मुथ्था हे खाजगी सावकारकी करत असल्याचे समजल्यानंतर आपण त्यांच्याशी नोव्हेंबर २०२४ मध्ये संपर्क केला.
त्यानंतर त्यांनी आपल्याला बेलापूर येथील त्यांच्या यश मोटर्स या ऑफिसवर बोलावले. परंतु, काम असल्याने आपला भाऊ तेथे गेला. त्यानंतर मुथ्था यांची भेट झाल्यानंतर त्यांनी धर (गहाण) म्हणून तुमची चारचाकी गाडी गोडाऊनला ठेवावी लागेल, असे सांगितले. तेव्हा त्यांनी टीटी फॉर्मवर सह्या घेतल्या व आम्हाला ५ टक्क्यांनी ५ लाख रूपये देतो असे सांगत ३२०० रूपये पहिल्या महिन्याचे व्याज कापून ४ लाख ६८ हजार रूपये दिले. त्यावेळी त्यांना पावती मागितली असता त्यांनी ती दिली नाही. आपण वेळोवेळी ५ लाख व त्यावरील ५ टक्के प्रमाणे होणारे व्याज असे २ लाख रोखीने दिले. तसेच माझा भाऊ व नातेवाईक विजय ओहोळ यांनी मुथ्था यांच्या ऑफिसवर जाऊन उर्वरीत ५ लाख रूपये दिले. तेव्हा पैसे देतानाचा मुथ्था यांच्या ऑफिसमधील व्हिडीओ माझा विजय ओहोळ याने मोबाईलमध्ये शुट केलेला आहे. असे एकूण ७ लाख रूपये सुनील मुथ्था यांना दिले. आपल्याकडे कोणतीही रक्कम बाकी नसल्याने आपण आपली बोलेरो जीप व कागदपत्रे मागायला गेलो असता तेव्हा मुथ्था व त्यांचा
मुलगा तेथे होते. त्यांनी गाडी देण्यास नकार देवून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तेव्हा मुथ्था यांनी तुझा संबंध नाही, येथे थांबला तर तंगडं तोडीन अशी धमकी दिली व लाथ मारली. तुझ्याकडे आणखी ५ लाख ४० हजार रूपये राहीले आहे, ते आणून दे व गाडी घेवून जा असे सांगितले. यावेळी त्यांनी लाकडी दांड्याने भावाला मारायला सुरूवात केली असता आपल्या सोबत असलेले विजय ओहोळ हे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आम्हाला हकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून सुनील मुथ्था आणि त्यांचा मुलगा (नाव माहीत नाही), रा. बेलापूर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
