श्रीरामपूर-
नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.
रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी टाळ २८ तारखेला चोरीला गेल्याची तक्रार अशोक बाबासाहेब चौधरी यांनी दिली होती. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाबासाहेब वाघमोडे यांनी तपास केला. तपासा दरम्यान पोलिसांनी मंदिराच्या आजूबाजूंचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मध्यरात्री १२ वाजता एक ऑटोरिक्षा संशयास्पद फिरताना आढळली. राजू नागरे व संगीता सूर्यकांत सर्जेराव (रा. कापकर वस्ती, शेवगाव) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ते चोरीच्या गुन्ह्यात निष्पन्न झाले. पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर पोलिसांनी विधीवत परत केल्यानंतर भजनी मंडळाने आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष अशोक चौधरी, अशोक रोडगे, नानासाहेब चौधरी व सारंगधर वाकचौरे इत्यादी हजर होते.
