श्रीरामपूर –
श्रीरामपूर माजी पंचायत समिती सभापती इंद्रनाथ थोरात यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या अमानुष प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी तीव्र संताप व्यक्त करत हल्लेखोरांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उक्कलगाव येथे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्या घरी भेट दिली.त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अविनाश आदिक बोलत होते. यावेळी पंडितराव थोरात,रवींद्र थोरात ,सुनील थोरात,शहाराम शेटे , भागवतराव मुठे,रावसाहेब आदिक, काळे,प्रशांत खंडागळे आदी उपस्थित होते.आदिक पुढे म्हणाले की,इंद्रनाथ थोरात यांच्यावर रस्त्यात अडवून हल्ला करण्यात आला. हे केवळ एका नेत्यावरचे नव्हे तर संपूर्ण सामाजिक सभ्यतेवरचे आक्रमण आहे. अशा घटनांमुळे श्रीरामपूरसारख्या प्रगल्भ व पुरोगामी तालुक्याचे सामाजिक आरोग्य धोक्यात येते आहे.गेल्या काही काळात समाजात अराजकता आणि धक्कादायक घटना घडत आहेत. सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत.सामाजिक स्वास्थ टिकवण्यासाठी पोलिसांनी केवळ घटनांची नोंद न करता, अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रिव्हेन्शन मोडमध्ये काम केले पाहिजे. या हल्ल्यामागची पार्श्वभूमी, कटकारस्थान, आणि संभाव्य राजकीय दुजाभाव याचा सखोल तपास करणे गरजेचे आहे.अशा प्रवृत्तींना मोकाट सोडल्यास उद्या आणखी गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी देऊन हल्ल्याचा तपास जलदगतीने करावा, दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आदिक यांनी केली.
