श्रीरामपूर-
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. या प्रकरणी एका जणास अटक करण्यात आली असून पोलिसांच्या पथकाने सुमारे ७६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे दि.०८/०७/२०२५ रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, समृध्दी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला क्र. MH-४६-BB-८०९८ या वाहनामध्ये काही जण हे राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला खाद्यपदार्थ पान मसाला, गुटखा वाहतूक केली जाणार आहेत. त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी पोलीस पथकासह रवाना झाले.वरील नमुद ठिकाणी जाऊन पथकातील अधिकारी व अंमलदार सापळा लाऊन थांबले असताना, थोड्याच वेळात समृध्दी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा राखाडी रंगाचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला येताना दिसला. तो जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करुन सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबून बातमीतील नमूद माहिती प्रमाणे सदरची गाडी आयशर कंपनीचा टेम्पो क्र. MH-४६-BB-८०९८ ही असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष सदर गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अकील रमजान शेख वय ४२ वर्षे रा. भगतसिंग नगर ता.जि. आदिलाबाद ता.जि. आदिलाबाद राज्य-तेलंगणा हल्ली रा. कोदरी ता.मागांव जि. यवतमाळ असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये सुगंधीत तंवाखू व पानमसाला भरलेल्या गोण्या मिळून आल्या. पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचांसमक्ष अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या समवेत वरील आरोपी व आयशर टेम्पो मध्ये मिळून आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून मुद्देमालाची तपासणी केली असता त्यात बाजीराव रॉयल ब्लेंडेड फ्लेवर पानमसाला २२,९५० पैकेट (७५ गोण्या),मस्तानी २१६ प्रीमियम च्युइंग सुगंधीत तंबाखू २४,७५० पैकेट (७५ गोण्या),आयशर टेम्पो क्र-MH-४६-BB-८०९८ असा एकूण ७६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमालाबाबत आयशर टेम्पो कंपनीचा चालक अकील रमजान शेख यास विचारपूस केली असता त्याने सदरचा माल हा मामू रोडलाईन ट्रॉन्सपोर्ट याचे व्यवस्थापक (पूर्ण नाव माहित नाही) याचे मार्फत घेवून जात असलेबाबतचे सांगितले.सदर मुद्देमाल पंचनामा करुन जप्त केला आहे.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री साठा करून महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा आरोपी व मामू रोडलाईन ट्रॉन्सपोर्ट याचे व्यवस्थापक (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांच्या फिर्यादी वरून गु.र.नं. ३६२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००३ व त्याखालील व नियमने २०१९ चे कलम २६ (२) (iv), २७ (३) (d)(e) रु कलम ३०(२) (३), ३(१) (२४), ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक
सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें,
उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, पोहेकों शंकर चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
