श्रीरामपूर-
महाबीज कंपनीचे सुमारे 15 लाख रुपये किंमतीचे सोयाबीन बियाणे श्रीरामपूर येथून लांबवण्यात आल्या बाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पुणे मार्केट यार्ड येथून सदरचा ट्रक सोयाबीन सह ताब्यात घेतला असून या कारवाईत एकुण 30,39,648 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,दिनांक 29 मे 2026 रोजी दत्तनगर गजानन रोडवेज ट्रन्सपोर्ट,श्रीरामपुर येथुन सुनिल भट्टड यांच्या नावे असलेली आयशर कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.12. व्ही.एफ. 6911 ही तिच्यात असलेल्या मालासाहित चालक जयसिंग मुक्ताजी भगत,रा.खानापुर जुन्नर जि.पुणे यास सुपुर्त केली होती. सदर गाडी तो दुसरीकडे घेवुन गेल्याने सदर घटनेबाबत फिर्यादी प्रदिप शिवनारायण भट्टड,रा.स्वस्तीक चौक, प्रगती शाळेजवळ,राहुरी ता.राहुरी जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 521/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/संदिप मुरकुटे,पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीजराजा आतार, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करण्यात आले होते.पथक गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व मुद्देमालाचा शोध घेत असताना हा आयशर ट्रक क्रमांक एम.एच.12 व्ही.एफ. 6911 ही राजगुरुनगर ता.खेड जि.पुणे येथील मार्केट यार्ड मध्ये उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जावुन सदर ठिकाणावरुन 15,00,000/- रुपये किमतीचा आयशर ट्रक, 15,39,648/-रुपये कि.चे महाबीज कंपनीचे सोयाबीनचे बियाणे असा एकुण 30,39,648/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ताब्यातील मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आली असुन पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे हे करीत आहे.
