श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे गोदावरी नदीपात्रातील वाळूवरून काल दोन गटात चांगलाच राडा झाला.या हाणामारीत काही चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या तर अनेकांना जणांना लाठ्या-काठ्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली.यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याचीही माहिती मिळाली परंतु पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचे स्पष्ट केले.अवैध वाळू उपशातून हा राडा झाल्याचे बोलले जात असून पोलिस ठाण्यात याबाबत अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नायगाव येथून मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उपसा होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वाळूवर अनेक वाळू तस्करांच्या नजरा आहेत.त्या ठिकाणी दुसऱ्या एका गटाने वाळू उपसा करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यास पहिल्या गटाकडून विरोध झाला त्यातून हा धुमश्चक्रीचा प्रकार घडला.४०-५० जणांच्या टोळक्याने या ठिकाणी नव्याने आलेल्या १०-१५ जणांना हाणामारी केली.त्यातून एकच गोंधळ उडाला. यामुळे परिसरातील वाड्या-वस्त्यांवर दहशतीचे वातावरण निर्माण झाले.पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
