श्रीरामपूर-
काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरात गोळीबारामध्ये मृत्यू झालेला बंटी जहागीरदार हा जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बाॅम्बस्फोटात आरोपी होता. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही भाजपच्या वतीने समर्थन करत असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व उपाध्यक्ष दीपक पटारे यांनी स्पष्ट केले.आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी बंटी जहागिरीदार हा संबंधित होता असाही आरोप दिनकर यांनी केला.
नुकतीच बंटी जहागिरदार याच्या भावाने
पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती.त्यास भाजपकडून उत्तर देत पालकमंत्री यांच्यावर टीका करणे ही निंदनीय बाब असून त्याचा आम्ही निषेध करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील लक्ष्मीनारायण हाॅटेलमध्ये भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक संजय गांगड, आशिष धनवटे दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, अर्जुन दाभाडे, रवी पाटील आदी उपस्थित होते.
दिनकर व पटारे यांनी मंत्री विखे यांनी शिर्डी येथे गुन्हेगारासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना सांगितले की,जिल्हातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याबाबत पालकमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. त्यांना जिल्ह्यात शांतता हवी आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत.
गुन्हेगाराला जात धर्म नसतो.त्याचे कोणीही समर्थन करणार नाही.भाजप कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही.पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूरसह जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्याचा मानस व्यक्त केला असून तशा सूचनाही पोलिसांना दिलेल्या आहे.मात्र काही जण त्याचे राजकारण करीत आहेत.भाजप कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
