श्रीरामपुर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवार सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या मंडपात होणार असून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रांत अधिकारी किरण सावंत यांनी दिली.
आज शनिवारी प्रभाग तीन मधील न्यायालयाच्या निर्णयामुळे लांबलेल्या एका जागेची निवडणूक होत असून जागा अनुसूचित जातीची आहे. या ठिकाणी पाच मतदान केंद्रे असून ३५ कर्मचारी त्या ठिकाणी मतदानाचे कर्तव्य पार पाडणार आहेत. सर्व मिळून १०० लोकांचा स्टाफ आज होणाऱ्या निवडणूकीसाठी सज्ज आहे. प्रभाग ३ मध्ये ४४८० एवढी मतदार संख्या आहे. सीडीजे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या इमारतीमध्ये हे मतदान केंद्र आहे. मतदान केंद्रावर ऑनलाईन नजर ठेवली जात प्रांत कार्यालयातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर देखरेखीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व १७ प्रभागातील नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या रविवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी प्रांत कार्यालयात उभारलेल्या मंडपात १० टेबल लावण्यात आले असून मतमोजणीचे दहा राऊंड होणार आहेत. प्रभाग तीन मध्ये मतदान झाल्यामुळे हे १० राऊंड होत आहेत. काही टेबलांवर चार, काहींवर पाच तर काहींवर सहा आणि एका केंद्रावर सात मतदान केंद्रे असल्याने प्रत्येक टेबलावर वेगवेगळे राऊंड होणार आहेत. एकूण १७ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे त्यासाठी प्रत्येक टेबलावर तीन याप्रमाणे कर्मचारी ५१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून दोन पर्यवेक्षक तसेच पेट्या ने आण करण्यासाठीचे धरून सुमारे ८० कर्मचारी मतमोजणीसाठी कार्यरत राहणार आहेत. मतमोजणी झाल्यानंतर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना तीन वेळा मतमोजणीची आकडेवारी दाखवण्यात येणार आहे. फेर पडताळणी करूनच मतपेट्या परत बंद केल्या जातील. दहा वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर आकडेवारी तीन ठिकाणी घेतली जाणार असून तिन्ही ठिकाणची आकडेवारी ही तपासणी अंतिम निकाल साधारणपणे साडेबारापर्यंत जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती ही प्रांत अधिकारी सावंत यांनी दिली. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप हे देखील उपस्थित होते.
