श्रीरामपूर-
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ.चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली.
यापूर्वी सकाळी ९ वाजता अहिल्यानगरमधील राज पॅलेस येथे सर्व संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाली.या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यानंतर त्यांची बिनविरोध प्रकिया पार पडली.
या निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत.काळे–विखे यांच्यातील सध्याचा असलेला राजकीय समन्वयदेखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घटक ठरल्याचे मानले जात आहे.
चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे, , आण्णासाहेब म्हस्के , अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, मा. आ.भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे.
निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखे पाटील यांना सहकार्य करणे आवश्यक असल्याने घुले यांना सर्वांनी समर्थन दिल्याचे स्पष्ट होत आहे.
बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर मा.आ.चंद्रशेखर घुले यांनी आपल्यावर सर्व संचालकांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले. तसेच पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
