श्रीरामपूर-
या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी पिक
हातातुन गेले आहे. केवळ ऊस पिक शेतकऱ्यांचे हातात आहे. त्यामुळे त्यातुन जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी जागृत झाला तर त्याला तसा दर मिळु शकतो,असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.
ताके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साखरेचे दर ४ हजार रुपये क्विंटल पेक्षा जास्त वाढले आहेत.त्याचा फायदा करुन घेण्यासाठी येत्या १६ तारखेला जयसिंगपूर येथे होणार्या ऊस परिषदेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मा.खा.राजु शेट्टी यांच्या वतीने मांडण्यात येणाऱ्या ऊस दर ठरावाला अनुमोदन द्यावे.ऊस परिषदेत ठरलेला दर आपल्या जिल्ह्यातील कारखान्यांना देण्यासाठी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहील.शेजारच्या पुणे जिल्ह्यातील दर प्रती टन ३ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले आहेत.आपल्याकडे आत्ता कुठे ३ हजार रुपये देऊ असे म्हणत उपकाराची भाषा काही साखर कारखानदार कार्यकर्त्यामार्फत बोलत आहेत. तर काही कारखानदारांनी ऊस दरा बाबत गुळणी धरली आहे.पुण्यात ३५०० शक्य आहे मग आपल्या कारखान्यांना का शक्य नसावा म्हणून हक्काने मागणी करणे गरजेचे आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचेकडे ऊसाच्या वजनाचा काटा मारणार्या कारखान्यांची यादी असल्याचे म्हटले आहे. त्याअर्थी ऊस वजनात काटा मारला जात आहे.सदरची यादी आपल्या उपस्थितीत मा.खा.राजु शेट्टी मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्याचा ठराव करणार आहेत.ज्या कारखान्याला ऊस देणार आहात त्यांचा तोडणी व वाहतूक खर्च साखर आयुक्तांनी किती मंजूर केलेला आहे, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे कारण तोडणी व वाहतूक खर्च वाढवुन ऊस दरावर दरोडा टाकण्याचा प्रकार होत आहेत.आपल्या ऊसाला जास्तीत जास्त दर मिळवण्यासाठी ऊस परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.
