श्रीरामपूर-
अशोक सहकारी साखर कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आज दि.29 रोजी अभूतपूर्व गोंधळात पार पडली.सभेत प्रचंड गोंधळ व राडा झाल्याने पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.अशोकचे सर्वेसर्वा मा.आ.भानुदास मुरकुटे यांची शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. अजित काळे व शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त प्रताप भोसले यांच्याशी चांगलीच खडाजंगी झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.या तिघांचीही ऊस दर आणि लेखा परीक्षण अहवालातील मुद्द्यांवरून एकमेकांशी चांगलीच हमरीतुमरी झाल्याने मुरकुटे समर्थक व संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.त्यामुळे सभास्थळी अभूतपूर्व राडा बघायला मिळाला. सभेत ऍड. अजित काळे यांनी मुरकुटे यांच्या कारभारावर नेमकेपणाने बोट ठेवले.35-40 वर्षांच्या अशोक कारखान्याच्या इतिहासात मुरकुटे यांना पहिल्यांदाच अशा रोषाला सामोरे जावे लागले.
मा.आ.मुरकुटे यांनी प्रताप भोसले यांना मी आणि माझे संचालक मंडळ राजीनामा देतो तुम्ही 3500 रुपये प्रति टन भाव देऊन दाखवा असे आव्हान दिले. ते आव्हान भोसले यांनी स्वीकारत तुम्ही राजीनामा देऊन व्यवस्थापन माझ्या ताब्यात द्या 3500 रुपये भाव सभासदांना आपण देऊन दाखवू असे मुरकुटे यांना सुनावले.चेअरमन मा आ भानुदास मुरकुटे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी व्हा चेअरमन बाबासाहेब आदिक, संचालक नीरज मुरकुटे, मा सभापती दीपक पटारे, संचालक रावसाहेब थोरात, हिम्मतराव धुमाळ, ज्ञानेश्वर काळे,मंजुश्री मुरकुटे, प्रताप भोसले, दीपक पटारे, गिरीधर आसने, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. अजित काळे, वंदनाताई मुरकुटे, सुनीता गायकवाड, सौ. हिराबाई साळुंके, कॉ. श्रीधर आदिक, सिद्धार्थ मुरकुटे विरेश गलांडे, पुंजाहारी शिंदे, भाऊसाहेब दौण्ड, अच्युत बडाख आदी उपस्थित होते.कार्यकरी संचालक संतोष देवकर यांनी सभेची नोटीस व विषय वाचन केले.धनगर समाजाच्या वतीने राजेंद्र पानसरे यांनी अशोक कारखान्याचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे नामकरण करावे अशी मागणी निवेदन देत केली.यावेळी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादकांचा सन्मान करण्यात आला.कार्लस साठे,कॉ.श्रीधर आदिक यांनीही सूचना मांडल्या.यावेळी बंदोबस्तासाठी प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

सुरवातीला सभा सुरू असताना प्रताप भोसले हे बोलायला उठले.तेव्हा तुम्ही आता लगेच बोलू नका असे म्हणत मा आ मुरकुटे यांनी त्यांना बोलायला मज्जाव केला.अशोक कारखाना बंद करण्याचा तुमचा डाव आहे.तुम्ही कुणाच्या सुपाऱ्या घेतल्या ते सभासदांना कळू द्या.आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे हा कारखाना जपला.कोणत्याही कारखान्याने अद्याप भाव जाहीर केलेला नाही.3500 रुपये भाव देण्यासाठी हे महाशय निघाले आहेत.365 दिवस हे गृहस्थ अमेरिकेत असतात.
अनेक मंडळींनी कारखान्याच्या कारभारावर टीका केली काही जणांनी कौतुक केले तर काही मंडळींनी सूचना केल्या. त्या सर्वांची नोंद घेऊन पुढील काळात ज्या सूचना योग्य आहेत त्यावर विचार करू.ज्यांनी कार्यक्षेत्रात ऊस वाढीसाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न नाही त्यांना ऊस देऊ नका.जे दारू तयार करतात त्यांच्याएव्हढा भाव आपण देऊ शकत नाही.कोणताही कारखाना बिन कर्जाचा नाही. सगळ्यावर 300 ते 400 कोटी कर्ज आहे. काही लोक भाव देत नाही म्हणून सभासदांना चिथावणी देतात.आम्ही नालायक असू तर दुसऱ्याच्या ताब्यात कारखाना द्या.तुम्ही उसाला 3500 भाव द्या. आम्ही सर्व जण राजीनामे देतो,असेही मुरकुटे म्हणाले.
प्रताप भोसले म्हणाले की,माझ्यावर मुरकुटे यांनी वैयक्तिक आरोप केले. मी पुढच्या वर्षी रिटायर होऊन इकडेच येतो.या संस्थेत आमची भावनिक गुंतवणूक आहे.अहवालात सरकारी येणे 25 कोटी दाखवले वास्तविक ते येणे फक्त 5 कोटी आहे. हे खोटं असेल तर माझ्यावर कारखाना व्यवस्थापनाने दावा दाखल करावा.आम्ही उसाला 3500 भाव देऊ. तुम्ही व्यवस्थापन माझ्या ताब्यात द्या.नुसते राजीनामे देतो असे म्हणू नका खरोखर राजीनामा द्या असे रोखठोक आव्हान त्यांनी दिले.यानंतर ऍड.अजित काळे म्हणाले की,कारखान्याची स्थिती अत्यंत वाईट आहे.तुम्ही इतरांच्या बरोबरीने भाव द्या,ऊस अशोकलाच देऊ.यावर्षी अहवालात 20 कोटी तोटा दाखवला आहे.कारखान्यावर अगोदरच कर्ज असताना अजून कशाला कर्ज घेतले जात आहे.उसाच्या भावाबाबत दिशाभूल केली जात आहे.2013 च्या कायद्या प्रमाणे ऊस दर द्यावा.सध्या कारखान्यावर 347 कोटीचे कर्ज आहे.चालू देणी आहेत.त्यामुळे अशोक आर्थिक संकटात आहे.आम्ही सभासदांना 3300 रुपये दर देऊ तुम्ही कारखान्याची सत्ता सोडून राजीनामे द्या.अहवालात अनेक गंभीर त्रुटी आहेत. कारखान्याला जिल्हा बँक कर्ज देण्यास तयार नाही.कामगारांचे 8 महिन्याचे पगार थकले आहेत.2027 ची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत.तुम्ही आज चालू वर्षीचा 3300 रुपये भाव जाहीर करा असे आवाहन काळे यांनी केल्या नंतर त्यांना मुरकुटे यांनी बराच वेळ बोललात आता दुसऱ्याला बोलू द्या असे म्हणत थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यास काळे यांनी विरोध दर्शवत5 मिनिटे मला बोलू द्या असे सुचवले त्यावर एकच गोंधळ उडाला आणि प्रचंड मोठा गदारोळ झाला.दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक होत एकमेकांच्या अंगावर धावून गेले.काही जणांनी काळे यांना माईक पासून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.त्यास काळे यांनी विरोध केला.त्यांनंतर माईकची लाईट बंद करण्यात आली.त्यामुळे काळे प्रचंड संतप्त झाले.शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही या प्रकाराने संतापले.त्यांनी काळे यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी केली.या गदारोळात पोलिसांनी व्यासपीठावर धाव घेतली. त्यास मुरकुटे यांनी आक्षेप घेतला.त्यावर काळे यांनी पोलीस प्रशासने कायदा व सुव्यवस्था राखावी ती त्यांची जबाबदारी आहे असे सुनावले.या सर्व घडामोडिंमुळे वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते.वाद विकोपाला जाऊ नये म्हणून पोलीसांनी केलेली विनंती काळे यांनी मान्य करत अखेर सभास्थळ सोडले. त्यांनंतर काही अंतरावरच रस्त्यावर ऍड अजित काळे यांनी घटनेचा निषेध करत निषेध सभा घेतली. तेव्हा काळे म्हणाले की,आपण कुणावरही टीका केली नाही. टवाळखोर लोकांकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.कारखान्याची सहकार अधिनियम 89 नुसार चौकशी सुरू झालेली आहे.हा सर्व सुनियोजित कट आहे.भाडोत्री गुंड आणून वाद निर्माण करणे योग्य नाही,असेहीत्यांनी सुनावले.
यावेळी ‘3500 रुपये भाव द्या नाहीतर खुर्च्या खाली करा’अशा घोषणांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी काळे यांच्या समवेत प्रताप भोसले, जितेंद्र भोसले, अनिल औताडे,युवराज जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

