श्रीरामपूर-
गेली चाळीस वर्षे अशोक कारखाना ताब्यात असणाऱ्या माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कारखाना आर्थिक डबघाईस आणला.आजमितीला कारखान्यावर ४५० कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे.सातत्याने कमी भाव मिळत असल्याने सभासद,ऊसउत्पादक अशोक कारखान्याकडे पाठ फिरवू लागले आहेत.आज ‘अशोकलाच ऊस द्या’ असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर का आली? याचे आत्मपरिक्षण करा,असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेन्द्र भोसले यांनी केले आहे.प्रसिध्दीस दिलेल्या पञकात श्री.भोसले यांनी माजी.आ.मुरकुटे यांच्या अशोक कारखान्याला ऊस देवून कामधेनु वाचवावी या आवाहनाची खिल्ली उडविली.ते पुढे म्हणाले की, अशोक कारखान्याच्या व्यवस्थापनाने गणेश कारखान्याचा आदर्श घेवून मागील हंगामाचे प्रतिटन ३०० रुपये व सन २३-२४ हंगामाचे २०० रु. असे ५०० रुपये पेमेंट दस-यापूर्वी अदा करावे.कामगार हे सभासद अथवा सभासदांची मुले आहेत तेव्हा कामगार व निवृत्त कामगारांचे थकीत देणे अदा करावे.कामगारांच्या नावावर घेतलेले कर्ज निल करावे.अन्यथा दस-यानंतर सभासद व कामगारांच्या पोटातील आग मस्तकात गेल्यास नेपाळमध्ये झाली तशी परिस्थिती कारखान्यावर होईल असा इशाराही श्री.भोसले यांनी दिला आहे.सभासद ऊस ऊत्पादकांना गणेश कारखान्यापेक्षाही कमी भाव घ्यावा लागतो आहे.कामगारांना आठ महिन्यांचे वेतन, निवृत्त कामगारांच्या ग्रॅज्युइटीच्या रकमाही थकीत आहेत.कामगारांच्या नावावर कर्ज काढून कारखाण्याचा खर्च भागविण्याची वेळ आली.या सर्व स्थितीमुळे अशोकरुपी कामधेनुची माजी आ.मुरकुटे यांनी खाटी गाय केली आहे.सी.ए.चेअरमन व सर्वेसर्वा असलेला अशोक कारखाना गणेश इतकाही भाव देत नाही.गणेश कारखान्याने १९८८पासूनचे कामगारांचे देणे चुकते केले. तर “अशोक”च्या व्यवस्थापनाने कामगारांचे वेतन थकविले.२५ टक्के पगार कपात सुरु केली.कोट्यावधीचे ऊस तोडणी मजूर, वाहतुकदार,व्यापारी देणेही थकविले.अनावश्यक गाळप,डिस्टीलरी,इथेनाॕल प्रकल्पांची क्षमतावाढ करुन कारखाना ४५० कोटी इतका कर्जबाजारी करुन ठेवला.आता परत ९०० टनाची गाळप क्षमतावाढ प्रस्तावित केली आहे.गेली ३० वर्षे विखे – थोरातांना शिव्या देऊन सभासदांच्या डोळ्यात धूळफेक केली. दारुचे कारखानदार जास्त दर देऊ शकतात मग आपल्याकडेही देशी दारू वगळता सर्व प्रकल्प आहेत. मग कबूल करूनही भाव का देऊ शकत नाही याचे उत्तर मुरकुटे यांनी दिले पाहिजे. प्रकल्पासाठी व विस्तारीकरणासाठी कपात केली नाही असे म्हणता मग ३००/४०० रुपये भाव कमी देऊन अप्रत्यक्षपणे ऊस बिलातुन कपात केली नाही का? शैक्षणिक संस्थांसाठी सभासदांकडून एक रुपयाही घेतला नाही म्हणणाऱ्या मुरकुटे यांनी सभासदांच्या ऊस बिलातून कपात केलेल्या भागविकास निधीचे काय केले? या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे.सध्या माजी.आ.मुरकुटे यांनी गावोगावी जाऊन जलपूजन करण्याचा धडाका लावला आहे.यात केवळ नातवाला प्रोजेक्ट करायचा हेतू आहे.श्री.मुरकुटे गेली २५ वर्षे आमदार नाहित.तरी पाटपाण्याची अडचण भासली नाही.यावरुन श्री.मुरकुटे यांनी पाटपाण्याचा केवळ राजकीय बागूलबुवा उभा केला होता हे सिध्द होते.स्व.गोविंदराव आदिक पाटबंधारे मंञी असताना खानापूर व भेर्डापूरचे के.टी.वेअर झाले.त्यानंतर स्व.दौलतराव पवारांनी पाणी प्रश्न धसास लावला.भांडारदराचे पाणी वाटप करुन तालुक्याला ५२ टक्के शाश्वत पाणी मिळवून दिले.ज्या स्व.जयंत ससाणे यांच्या आमदारकीच्या काळात समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा झाला असे म्हणत श्री.मुरकुटे खडे फोडायचे त्यांच्या गटाशीच सत्तेसाठी नंतर हातमिळवणी केली.ज्या माजी आ.भाऊसाहेब कांंबळे यांच्या काळात ब्लाॕक रद्द झाले.त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता बसत आहेत.अन्याय सहन करणाऱ्या सभासद, ऊसउत्पादक व कामगारांनी आता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.
